Ground Report : 'समृद्धी'मुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण; रोजगाराचा पत्ता नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:50 PM2019-09-24T13:50:06+5:302019-09-24T13:50:12+5:30

-  सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा : कारंजा विधानसभा मतदारसंघातील काही गावांच्या शिवारात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू ...

Internal road damange due to 'Samruddhi'; No work address! | Ground Report : 'समृद्धी'मुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण; रोजगाराचा पत्ता नाही !

Ground Report : 'समृद्धी'मुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण; रोजगाराचा पत्ता नाही !

googlenewsNext

-  सचिन राऊत 
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : कारंजा विधानसभा मतदारसंघातील काही गावांच्या शिवारात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यांसाठी बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे तालुक्यातील पोहा, कारंजा आणि मोहगव्हाण या परिसरात असलेल्या गावातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड चाळण झाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघड झाले. कारंजा-मानोरा हा मुख्य रस्ता केवळ खड्ड्यांमध्येच राहिला असल्याने दर दिवसाला या रोडवर अपघात घडत असल्याचे मानोरावासीयांचे म्हणणे आहे.
कारंजा विधानसभा मतदारसंघातील कारंजानंतर मानोरा हे तालुक्याचे ठिकाण आणि मोठे शहर आहे. मानोरा येथील अनंत पाटील हे एकदा आमदार झाले; मात्र त्यानंतर केवळ कारंजा येथील रहिवासी असलेलेच आमदार या मतदारसंघात निवडून आले. त्यामुळे मानोरा तालुका विकासापासून कोसो दूर आहे. आ. राजेंद्र पाटणी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागताच भर पावसाळ्यात बंधाऱ्यांच्या कामाच्या उद्घाटनाचा सपाटा लावला; मात्र त्यापूर्वी आमदारांनी या तालुक्याला सावत्र वागणूक दिल्याचा आरोप मतदारांनी केला आहे.
शिक्षणाची पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या कारंजा शहरात मोठे इन्स्टिट्युट तसेच रोजगारासाठी प्रयत्नच झाले नसल्याचेही लोकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील ९० अधिक खेड्यांतील रोहित्र वारंवार नादुरुस्त असतात, याच्या तक्रारीही दूर्लक्षीतच राहिल्याचेही अनेकांनी सांगीतले.
भूसंपादन १५ वर्षांपूर्वी; मात्र मोबदला नाही!
नागपूर-जालना या मार्गासाठी कारंजा शहरासह तालुक्यातील काही ठिकाणची भूसंपादन प्रक्रिया १५ वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आल्याची माहिती हॉटेल संचालकांनी दिली; मात्र भूसंपादनानंतर शासनाने मोबदलाच दिला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.


बंधाºयाच्या कामांचे पावसाळ्यात भूमिपूजन
आ. राजेंद्र पाटणी यांनी पाच वर्षांच्या कालावधीत मानोरा तालुक्यातील विकास कामे केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला; मात्र गत काही महिन्यांपासून त्यांनी पावसाळ्यातच बंधाºयांची कामे करण्यासाठी उद्घाटनाचा सपाटा लावला. यावरून विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी आता त्यांना मानोरा दिसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.कारंजा ते धनज या २६ किलोमीटरच्या रस्त्याचे गत काही वर्षांपासून द्विपदरीकरण करण्यात येत आहे. १० ते १२ किलोमीटरपर्यंत हा रस्ता द्विपदरी करण्यात आला आहे. त्यानंतर एकाच बाजूने केवळ खडीकरण करण्यात आले आहे. अर्धवट आणि ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरलेल्या या रस्त्याचे काम प्रचंड संथ गतीने सुरू असतानाही या रोडवरील चार ते पाच गावांमध्ये आतापर्यंत या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.


संजय गांधी निराधार योजना अध्यक्षाविना
कारंजा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेला गत अनेक महिन्यांपासून अध्यक्षच नाही. त्यामुळे निराधार योजनेचे कामकाज प्रभावित झाले असल्याचा आरोप निराधारांनी केला आहे. पूर्वीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे पद रिक्त असून, आमदारांनी याकडे कानाडोळा केला आहे.


कारंजा वन पर्यटनाची कामे रखडली!
कारंजा वन पर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे. सदर वन पर्यटन केंद्र पूर्णत्वास आले असले तरी याचा पुढील विकास मात्र खुंटल्याचे वास्तव आहे. कारंजा वन पर्यटन केंद्राच्या अत्याधुनिकीकरणाकडे आमदारांनी पाठ फिरविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वन पर्यटनामध्ये लावण्यात आलेली झाडांची योग्य निगा राखण्यात येत नसल्याचेही नागरिकांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


बसस्थानकावर धुळीचे साम्राज्य
कारंजा बसस्थानकावर साधे डांबरीकरणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना दिवसभर धुळीतच राहावे लागत असल्याचे चित्र कारंजा बसस्थानकावर दिसले. पार्किंग सुविधेचाही बट्ट्याबोळ असून, एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी येणाºया वृद्धांनाही दिवसभर ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र बसस्थानकावर होते.

Web Title: Internal road damange due to 'Samruddhi'; No work address!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.