उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकऱ्याने उपटली डाळींब बाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 02:32 PM2019-11-19T14:32:36+5:302019-11-19T14:34:45+5:30

बागेचे नुकसान पाहता त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण बागेतील झाडे जेसीबीने उपटून फेकून दिली.

 Farmers uprooted pomegranate garden due to no cost of production! | उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकऱ्याने उपटली डाळींब बाग!

उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकऱ्याने उपटली डाळींब बाग!

Next
ठळक मुद्देएकूण ७ लाख ५० हजार रुपये तीन वर्षात खर्च आला. एकूण ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.तब्बल साडेतीन लाख रुपयाचे यामध्ये नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतीत नवनविन प्रयोग यशस्वी करणारे तथा राज्य शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी नंदकिशोर उल्हामाले यांनी आपल्या दोन एकर शेतात डाळींब बाग तयार करुन नविन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. विदर्भात डाळींब बागेसाठी पोषण वातावरण नसून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे पाहून तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले बागेचे नुकसान पाहता त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण बागेतील झाडे जेसीबीने उपटून फेकून दिली.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील प्रयोगशिल कास्तकार नंदकिशोर उल्हामाले हे शेतीत नवनविन प्रयोग करण्यासाठी जिल्हयासह मराठवाडयात प्रसिध्द आहेत. त्यांनी २०१४ मध्ये आपल्या दोन एकराच्या शेतीमध्ये डाळींबाची बाग उभारली. यासाठी त्यांनी सर्वप्रथम तारकंपाऊडसाठी १ लाख ५० हजार, ४० हजार रुपये डाळींबाच्या कलमा,ड्रीपसाठी (ठिंबक सिंचन) ७० हजार रुपये तसेच खड्डे खोदणे व इतर खर्च ३० हजार रुपये असा एकूण ३ लाख ९० हजार रुपये खर्च केले. त्यानंतर या बागेच्या संगोपनासाठी एकरी साठ हजार रुपयाप्रमाणे दोन एकरासाठी ३ लाख साठ हजार रुपये खर्च आला. डाळींबाची बाग उभारण्यासाठी ३ लाख ९० हजार व संगोपनासाठी ३ लाख ६० हजार असे एकूण ७ लाख ५० हजार रुपये तीन वर्षात खर्च आला. या तुलनेत उत्पादन न झाल्याने, बागेसाठी लावण्यात आलेला खर्चही न निघाल्याने व अवकाळी पावसामुळे झाडे सुकल्याने अखेर त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी जेसीबीव्दारे बाग उपटून टाकली. तत्पूर्वी त्यांनी कृषी विभागाकडे अवकाळी पावसामुळे या बागेचे झालेले नुकसान भरपाईची मागणी केली असता कृषी सहायकाकडून आपल्या बागेला नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे सांगितल्याने प्रयोगशिल शेतकºयाचे मनोबल खचल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून उल्हामाले यांना नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत गावातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.


खर्च साडेसात लाख हाती आले ४ लाख
- मोठया अपेक्षेने शेतीत नविन प्रयोग करुन डाळींबाच्या बागेसाठी ७ लाख ५० हजार रुपये खर्च केले. बाग निर्माण झाल्यानंतर त्यामधून पहिल्यांदा ३ लाख, दुसऱ्यांदा ६० हजार तर तिसºयांदा ४० हजार असे एकूण ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तब्बल साडेतीन लाख रुपयाचे यामध्ये नुकसान झाल्याचे शेतकरी नंदकिशोर उल्हामाले यांनी सांगितले.


- नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे बागेचे नुकसान तर झालेच शिवाय विदर्भात डाळींबासाठी पोषक वातावरणही नसल्याने बाग उपटून टाकण्यात आली. परंतु अवकाळी पाऊस आला नसता तर कदाचित अजून दोनवेळा फळे काढता आली असती असे शेतकºयाचे म्हणणेआहे.
कृषी विभाग म्हणतोय नुकसान भरपाई नाही


- मालेगाव तालुकयामघ्ये अवकाळी पावसामुळे कुठेच फळबागांचे नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असल्याने उल्हामाले यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. अवकाळी पावसामुळे तालुक्यात केवळ सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले असून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याने या शेतकºयाला नुकसान भरपाईपासून मुकावे लागणार आहे.


- दरम्यान फळबागांवर तेल्यारोग आल्यानेही नुकसान संभवते. ४४ अंशसेल्सियसच्यावर तापमान असल्यास डाळींबाच्या बागेवर परिणाम होतो. विदर्भात तसेच शिरपूर परिसरात ४७ पर्यंत तापमान होते.


गत दोन वर्षात उन्हाळयातील वाढलेले तापमानामुळे आधी तेल्यारोग व नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झाडे सुकलीत. परंतु कृषी विभागाकडून फळबागांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल पाठविण्यात आला असल्याने नुकसान भरपाई मिळणार नाही.विदर्भातील जमिन व हवामान अनुकूल नसल्याने आपण पुन्हा डाळींब उत्पादन घेणार नाही.
-नंदकिशोर उल्हामाले
नुकसानग्रस्त शेतकरी, शिरपूर जैन


फळबागांवर नेहमीच विविध कीड, रोग पसरतात. पीक नुकसान पाहणीदरम्यान कुठेही फळबागांचे नुकसान झाले नसल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे संबधितांकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात नमूद नाही. तरी सुध्दा शेतकºयाचे नुकसान झाले असे वाटत असेल तर त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा.
-गजानन मालस
कृषी सहाय्यक, शिरपूर जैन

Web Title:  Farmers uprooted pomegranate garden due to no cost of production!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.