कडक निर्बंध संपले तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:40 AM2021-05-16T04:40:09+5:302021-05-16T04:40:09+5:30

वाशिम : दुसऱ्या लाटेत अनेक लहान मुलांना कोरोना संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. संभाव्य कोरोनाची तिसरी लाट लहान ...

Even if strict restrictions are lifted, do not leave children out of the house! | कडक निर्बंध संपले तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका !

कडक निर्बंध संपले तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका !

Next

वाशिम : दुसऱ्या लाटेत अनेक लहान मुलांना कोरोना संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. संभाव्य कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना प्रभावित करणार असल्याचे बोलले जात असल्यामुळे, कडक निर्बंध संपले तरी मुलांना घराबाहेर सोडू नका, मुलांची विशेष काळजी घ्या, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

पहिल्या लाटेत १८ तसेच १० वर्षांआतील मुलांना फारसा कोरोना संसर्ग झाला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र १० वर्षांआतील मुलांनादेखील कोरोना संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. बहुतेकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. कुटुंबातील अनेक सदस्यांसोबत त्यांनाही लागण झाल्याचे आढळत आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना प्रभावित करणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे आपल्यापासून पाल्यांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची विशेष दक्षता पालकांना घ्यावी लागणार आहे. कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतरही मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. ताप व सर्दी अशी लक्षणे दिसून येताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे. लहान मुलांना कोरोना संसर्ग झाल्यास सहसा लक्षणे नसतात, सौम्य असतात; पण ते संसर्ग पसरवू शकतात. त्यामुळे पालकांनी बालकांच्या आरोग्याप्रती जागरूक राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

००००००००००

बालरुग्णांसाठी १०० खाटांचे नियोजन

दुसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील जवळपास २१०० बालकांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाच्या वतीने बालरुग्णांसाठी जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील कोविड हॉस्पिटलमध्ये १०० खाटांचे नियोजन सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सध्या बालकांसाठी सरकारी रुग्णालयात स्वतंत्र खाटा उपलब्ध नाहीत. जेथे इतर कोरोना रुग्ण आहेत, त्याच वाॅर्डमध्ये बालकांवर उपचार करण्यात येतात. संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांची गैरसोय होऊ नये म्हणून १०० खाटांचे नियोजन सुरू आहे.

०००००००००००००००

कोरोनाचे १८ वर्षांखालील रुग्ण २१५०

दुसऱ्या लाटेतील रुग्ण २१५०

१० वर्षांपेक्षा कमी वयाचे रुग्ण ८६०

०००००००००००

लहान मुलांमध्ये कोरोनाचे लक्षण काय?

वय १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना कोरोनाची जी लक्षणे दिसून येतात, ती सर्व लक्षणे बालकांमध्ये दिसून येत नाहीत. ताप व खोकला येणे, सुस्तपणा, भूक न लागणे ही लक्षणे दिसून येतात.

लहान मुलांना कोरोना झाल्यास सहसा फारशी लक्षणे नसतात, सौम्य असतात; पण ते संसर्ग पसरवू शकतात. सौम्य आजार असल्यास एक्सरे किंवा रक्ताच्या चाचण्या करण्याचीही गरज नाही. ताप असल्यास पॅरासिटेमॉल द्यावे. पाच दिवसांनंतर ताप येत राहिला, अंगावर पुरळ दिसले, खाणे-पिणे कमी झाले, खोकला, दम लागल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा. कोरोना चाचणी अवश्य करावी.

००००००००

लस येईपर्यंत काळजी घ्यायलाच हवी

सध्या १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. १८ वर्षांखालील बालकांसाठी लस उपलब्ध होईपर्यंत बालकांची विशेष काळजी घ्यावी. लवकर निदान व उपचारातून रुग्ण या आजारातून लवकर बरा होऊ शकतो.

- डॉ. विजय कानडे

बालरोगतज्ज्ञ, वाशिम

०००००००

आपल्यापासून बालकांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता प्रत्येक पालकाने घेणे आवश्यक आहे. बालकांमध्ये ताप, खोकला, अशक्तपणा, सुस्तपणा, आदी लक्षणे दिसून येताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. किरण बगाडे, बालरोगतज्ज्ञ, वाशिम.

००००

घरी राहणे, मास्क वापरणे व सॅनिटायजेशन या तीन बाबी मुलांना कोरोनापासून दूर ठेवण्यास महत्त्वाच्या ठरू शकतात. बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालकांनी विशेष दक्ष असावे. काही लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. राम बाजड, बालरोगतज्ज्ञ

Web Title: Even if strict restrictions are lifted, do not leave children out of the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.