जिल्हा परिषद निवडणूक; रणधुमाळीने तापले राजकीय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:26 PM2020-01-01T12:26:22+5:302020-01-01T12:26:37+5:30

कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

District Council Elections; Warm political atmosphere | जिल्हा परिषद निवडणूक; रणधुमाळीने तापले राजकीय वातावरण

जिल्हा परिषद निवडणूक; रणधुमाळीने तापले राजकीय वातावरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गण असे मिळून एकूण ७२४ उमेदवार निवडणुक रिंगणात असून, रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जिल्हा परिषदेचे ५२ गट व पंचायत समितीचे १०४ गण आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्वच गट व गणातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. ५२ गटासाठी २६३ उमेदवार रिंगणात असून, रणधुमाळीला प्रारंभ झाला. कारंजा तालुक्यात ८ जिल्हा परिषद गटासाठी ४९ उमेदवार, वाशिम तालुक्यात १० गटासाठी ५० उमेदवार, मालेगाव तालुक्यात ९ गटासाठी ५३ उमेदवार, रिसोड तालुक्यात ९ गटासाठी ३७ उमेदवार, मंगरूळपीर तालुक्यात ८ गटासाठी ३५ उमेदवार आणि मानोरा तालुक्यात ८ गटासाठी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १०४ पंचायत समिती गणासाठी एकूण ४६१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये कारंजा तालुक्यातील १६ पंचायत समिती गणासाठी ७२ उमेदवार, मंगरूळपीर तालुक्यात १६ गणासाठी ७० उमेदवार, वाशिम तालुक्यात २० गणासाठी ७७ उमेदवार, मालेगाव तालुक्यात १८ गणासाठी ८८ उमेदवार, रिसोड तालुक्यात १८ गणासाठी ७२ उमेदवार, मानोरा तालुक्यात १६ गणासाठी ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, भारिप-बमसं, वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात असून, सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवरची सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून स्टार प्रचारकांची यादीही प्रसिद्ध झाली आहे. स्टार प्रचारकांची सभा लावण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’ लावल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही सदस्य संख्या वाढविण्यासाठी मंत्र्यांच्या सभांचे नियोजन केल्याची माहिती आहे. शिवसेना व भाजपाच्यावतीनेही सभांचे नियोजन असून, अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी अंतर्गत गटबाजी शमविण्यावर भर दिला जात आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे भारिप-बमसं या बॅनरखाली निवडणूक लढविली जात असून, दोन अंकी आकडा गाठण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. माजी खासदार अनंतराव देशमुख यांची वाशिम जिल्हा जनविकास आघाडीदेखील रिसोड, मालेगाव व मानोरा तालुक्यात नशीब आजमावत असून, दोन अंकी आकडा गाठण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रणधुमाळीला प्रारंभ झाल्याने कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येते.
(प्रतिनिधी)

Web Title: District Council Elections; Warm political atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.