परजिल्ह्यातील कापूस वाशिम जिल्ह्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:28 PM2020-03-18T12:28:24+5:302020-03-18T12:28:36+5:30

यवतमाळ जिल्ह्यासह, अकोला, हिंगोली व इतर जिल्ह्यातील कापूस या केंद्रावर दाखल होत आहे.

Cotton from other district sell in Washim district | परजिल्ह्यातील कापूस वाशिम जिल्ह्यात !

परजिल्ह्यातील कापूस वाशिम जिल्ह्यात !

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या काही दिवसांत खासगी बाजारात कपाशीच्या दरात मोठी घसरण झाल्याने कापूस उत्पादकांनी शासकीय खरेदी केंद्राकडे मोर्चा वळविला आहे. त्यात वाशिम जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यासह, अकोला, हिंगोली व इतर जिल्ह्यातील कापूस या केंद्रावर दाखल होत असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची पंचाईत झाली असून, कापूस मोजणीसाठी दोन दिवस लागत असल्याने शेतकऱ्यांना वाहन भाड्याचा भुर्दंडही सोसावा लागत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यात ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात कपाशीची लागवड झाली. प्रामुख्याने मानोरा, मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात कपाशीची लागवड होती. नोव्हेंबर, डिसेंबरमधील अवकाळी पावसाचा फटका वगळता कपाशीचे उत्पादनही चांगले झाले. तथापि, कापसाची खरेदी सुरू झाल्यानंतर खासगी बाजारात कापसाचे दर गडगडले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. दरम्यान, जिल्ह्यात अनसिंग आणि मंगरुळपीर येथे थेट सीसीआयने, तर मानोरा आणि कारंजा येथे सीसीआयचे उपअभिकर्ता (सबएजंट) म्हणून कापूस पणन महासंघाने कपाशीची खरेदी सुरु केली. बाजारात दर घटल्याने शासकीय खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, आजवर १.५० लाख क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी या केंद्रावर झाली आहे. मंगरुळपीर आणि अनसिंगसह कारंजा येथील केंद्रावर वाहनांच्या मोठ्या रांगा उभ्या असल्याचे दिसून येत आहे. त्यातच यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील कापूसही येथे विक्रीसाठी येत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस मोजणीला प्रचंड विलंब होत आहे.


 शेतकºयाचा दोन दिवस मुक्काम
कोठारी: मंगरुळपीर येथे बियाणी जिनिंग फॅ क्टरीत सीसीआयचे खरेदी केंद्र आहे. या ठिकाणी मंगरुळपीर तालुक्यातील अनेक शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. त्यात कोठारी येथील ज्ञानेश्वर हिमगिरे, रामेश्वर हिमगिरे, गणेश करडे आणि विठ्ठल पवार या शेतकºयांनी १६ मार्च रोजी सकाळी कापूस मोजणीसाठी आणल्यानंतरही १७ मार्च रोजी ६ वाजेपर्यंतही त्यांच्या कपाशीची मोजणी होऊ शकली नव्हती. परजिल्ह्यातील कापूस, येथे येत असल्याने आम्हाला दोन दिवस मुक्काम करावा लागतो. त्यामुळे इतर कामे खोळंबतात आणि वाहनभाड्याचा अतिरिक्त भुर्दंडही सोसावा लागत असल्याचे कोठारी येथील शेतकरी विठ्ठल पवार यांनी सांगितले.

सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर देशातील कोठूनही आलेला कापूस खरेदी करावा लागतो. आम्हाला शेतकºयास नकार देता येत नाही. कापसाची आवक वाढल्याने क्रमांकानुसार मोजणी करण्यात येत आहे.
- उमेश तायडे,
सीसीआय खरेदी केंद्रप्रमुख
मंगरुळपीर,


मानोरा येथील खरेदी केंद्रावरपूर्वी कापूस मोजणीला विलंब होत असे; परंतु शेतकºयांना विलंब होऊ नये म्हणून, बाजार समितीच्यावतीने एसएमएस पाठवून मोजणीच्या दिवशीच बोलावण्यात येत आहे.
-एस. बी. जाजू, ग्रेडर, मानोरा,
कापूस पणन महासंघ

Web Title: Cotton from other district sell in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.