Computer operators have not been honored for four months | संगणक परिचालकांना चार महिन्यांपासून मानधनच नाही
संगणक परिचालकांना चार महिन्यांपासून मानधनच नाही


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत शेकडो संगणक परिचालकांना गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे आधीच तुटपुंज्या मानधनावर काम करीत असलेल्या या संगणक परिचालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीचीच पाळी आली आहे.
वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात २२ हजार संगणक परिचालक ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल इंडियाचे कामकाज करीत आहेत. सन २०११ १२ मध्ये संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र अर्थात ही ‘संग्राम’ योजनेंतर्गत या २२ हजार संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ मध्ये याच संगणक परिचालकांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अंतर्गत केंद्रचालकाचे पद देऊन पुन्हा नियुक्त करण्यात आले. राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ प्रकल्प सुरू केला आहे. या संदर्भातील शासन निर्णयानुसार एका केंद्रचालकाना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन मंजूर करण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापक ४५० रु., स्टेशनरीसाठी २७०० रुपये प्रति महिना आणि प्रशिक्षणसाठी १३०० रुपये व इतर मिळून एकुण १२,५०० रुपये कंपनी आकारते, तरे ग्रामपंचायत एका वर्षासाठी १ लाख ४७ हजार रुपये या कंपनीला देते.
यामधूनच नियमित केंद्रचालकांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन मिळते. त्यात टीडीएसच्या काही रक्कम कंपनी आपल्या खात्यात ठेवते. हे टीडीएस केंद्रवालकांनाही मिळणे अपेक्षीत असताना अद्याप कोणत्याच संगणक परिचालकाला हे टीडीएस मिळाले नाही.
त्यातच या संगणक परिचालकांचे एप्रिल, मे, जुन आणि जुलै मिळून चार महिन्यांचे वेतन संबंधित कंपनीकडे थकले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील संगणक परिचालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसह शासनाने या संगणक परिचालकांच्या समस्येची दखल घेऊन तातडीने मानधन अदा करावे, अशी मागणी संगणक परिचालक करीत आहेत.
 
कामबंद आंदोलानाला प्रारंभ !
गतवर्षीच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीत कार्यरत संगणक परिचालकांच्या समस्यांबाबत बोलताना १० दिवसांच्या आत सर्व समस्यांचा निपटारा करण्यासह संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आता ८ महिने उलटले तरी, त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. तसेच इतरही विविध मागण्या प्रलंबित असल्याने मंगरुळपीर तालुक्यासह राज्यभरातील संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात नियुक्तीचे आश्वासन दिले होते. आता ८ महिने झाले तरी, त्याची दखल घेण्यात आली नाहीच उलट चार महिन्यांपासून आमचे मानधनही झाले नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
-ज्ञानेश्वर मुखमाले
मंगरुळपीर तालुकाध्यक्ष
संगणक परिचालक संघटना


Web Title:  Computer operators have not been honored for four months
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.