Compassionate fasting to accommodate in government service | शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारकांचे उपोषण

शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारकांचे उपोषण

वाशिम : प्रचलित शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच शिक्षण संस्थेतील रिक्त जागांवर तात्काळ सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी अनुकंपाधारकांनी २४ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
शासन सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या एका वारसाला नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र या धोरणाला प्रशासनाकडून हरताळ फासल्या जात असल्याने अनुकंपा पदभरती करण्यास दिरंगाई होत आहे. प्रचलित शासन निर्णयानुसार रिक्त पदांच्या २० टक्के पदे अनुकंपाची भरणे आवश्यक असताना प्रशासन मात्र भरती करण्यास दिरंगाई करत आहे, असा आरोप करीत अनुकंपाधारकांनी २४ जानेवारीपासून वाशिम येथे उपोषणाला सुरूवात केली. नोकरीत सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारक संघातर्फे यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्य विभाग प्रमुखांना निवेदन  दिले; आंदोलनही केले. परंतू, अद्याप हा प्रश्न निकाली निघाला नाही. याकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी अनुकंपाधारक संघाचे प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष किशोर अवचार यांच्या नेतृत्वात २४ जानेवारीपासून अनुकंपाधारकांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. या आंदोलनात अभिजीत निंबेकर, योगेश राठोड, प्रफुल इंगोले, सतीश भेंडेकर, रवि गाडे, ठाकरे इलियास खान, पुरुषोत्तम जाधव, भारत साबळे, बांगरे आदींचा सहभाग आहे.

Web Title: Compassionate fasting to accommodate in government service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.