पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरातून पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 11:28 AM2021-01-13T11:28:41+5:302021-01-13T11:31:07+5:30

Washim News वाशिम जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाने ‘ओल्ड बुक बँक’ अभियान राबविण्याची तयारी केली आहे.  

Attempt to protect environment through recycling of textbooks! | पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरातून पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न!

पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरातून पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘ओल्ड बुक बँक’ हे अभियान राबविण्याची तयारी केली आहे.जबाबदारी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पाठ्यपुस्तक निर्मितीतून होणारी हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार वाशिम जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाने ‘ओल्ड बुक बँक’ अभियान राबविण्याची तयारी केली आहे.  
समग्र शिक्षा योजनेंतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. 
यासाठी राज्य शासनाला दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपयांंपेक्षा अधिक खर्च करावा लागतो. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची योग्यरीतीने जपणूक करतात व त्यांना सुस्थितीत ठेवतात. अशा पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचा पुनर्वापर केल्यामुळे कागदाची बचत होईल आणि पर्यायाने कागद निर्मितीतून होणारा पर्यावरणाचा ºऱ्हासही थांबेल, हा विचार करून राज्यशासनाने पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय ८ डिसेंबर रोजी घेतला आहे. 
राज्य शासनाच्या या प्रकल्पानुसार वाशिम जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ‘ओल्ड बुक बँक’ हे अभियान राबविण्याची तयारी केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ओल्ड बुक बँक अंतर्गत गतवर्षीच्या सत्रात विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या पुस्तकांचे संकलन करून त्यातील सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचे वितरण पुढील सत्रात केले जाणार आहे. 


गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना सूचना
शासनाच्या पाठ्यपुस्तक पुनर्वापर या पथदर्शी प्रकल्पानुसार जिल्ह्यात ‘ओल्ड बुक बँक’ अभियानांतर्गत गतवर्षीच्या सत्रातील पुस्तकांचे संकलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करून सुस्थितीत असलेल्या पुस्तकांची जपणूक  करून ते पुढील वर्षी विद्यार्थ्यांना वितरित करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. या संदर्भात सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखांसह मुख्याध्यापकांना सूचनाही जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

इतरही विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे आवाहन 
राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना गतसत्रात मोफत पुस्तके वितरित करण्यात आली. त्यांच्याकडील चांगल्या स्थितीत असलेल्या पुस्तकांचे संकलन जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून केले जाणार आहेच. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांनी गतवर्षी बाजारातून पुस्तके विकत घेतली अशा विद्यार्थ्यानीही चांगल्या स्थितीतील पुस्तके संबंधित शाळेत देऊन पर्यावरण रक्षणात हातभार लावावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पाठ्यपुस्तक पुनर्वापर या पथदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ओल्ड बुक बँक’ हे अभियान राबविले जाणार आहे. यात गतवर्षी मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमातील पुस्तकांचे संकलन करून योग्यस्थितीतील पुस्तकांचे पुन्हा वाटप केले जाईल. इतरही विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडील चांगल्या स्थितीतील पुस्तके शाळात जमा करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा.
-गजाननराव डाबेराव,  
प्र. उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. वाशिम 

Web Title: Attempt to protect environment through recycling of textbooks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.