दहावी अनुत्तीर्ण, अशिक्षितांची आधार नोंदणीत गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:45 PM2019-08-30T13:45:42+5:302019-08-30T13:46:38+5:30

अनेकांची नोंदणी रद्द झाली असून, दाखला मिळविण्यात अडचणी येत असल्याने त्यांची गोची झाली आहे.

Aadhar registration : class fail and illiterates people get problem | दहावी अनुत्तीर्ण, अशिक्षितांची आधार नोंदणीत गोची

दहावी अनुत्तीर्ण, अशिक्षितांची आधार नोंदणीत गोची

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आधार कार्डपासून वंचित असलेल्या आणि दुरूस्ती करण्यासाठी ची गरज असलेल्या नागरिकांसाठी आता नवी अट ठेवण्यात आली आहे. दहावीपेक्षा कमी शिकलेल्या किंवा अशिक्षीत लोकांना जन्मतारखेच्या पुराव़्यासाठी राजपत्रित अधिकारी, आमदार, खासदारांच्या दाखल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांची नोंदणी रद्द झाली असून, दाखला मिळविण्यात अडचणी येत असल्याने त्यांची गोची झाली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांची आधार नोंदणी जवळपास पूर्ण झालेली असली तरी, काही नागरिकांची नोंदणी अद्याप शिल्लक आहे, तर पूर्वी काढण्यात आलेल्या आधारकार्डमध्ये त्रुटी असल्याने त्यांची आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी धडपड सुरू आहे. आधार नोंदणीसाठी आधीच जिल्ह्यात मर्यादित केंद्र असताना ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाने’ काही नव्या अटी लागू केल्या आहेत. या अटींमध्ये प्रामुख्याने आधार नोंदणी करण्याची आणि जन्मतारखेतील दुुरुस्ती करण्याची अट खुप किचकट आहे. यात दहावी किंवा त्यापुढे शिक्षण घेतलेल्या नागरिकांना आधार नोंदणी किंवा जन्मतारखेतील दुरुस्ती करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला जोडणे पुरेसे आहे. तथापि, ज्या लोकांचे शिक्षण हे दहावीपेक्षा कमी आहे किंवा जे अशिक्षित आहेत. अशा लोकांना जन्मतारखेबाबत राजपत्रित अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र किंवा आमदार, खासदाच्या लेटर हेडवरील स्वाक्षरीसह दाखला जोडणे बंधनकारक केले आहे. या अटीचे पालन न करता नोंदणी करणाºया केंद्रचालकाला याचा भुर्दंड सोसावा लागत आहेच शिवाय संबंधित व्यक्तीची नोंदणीही रद्द होत आहे. आवश्यक दाखला न जोडल्यामुळे अनेक व्यक्तींची आधार नोंदणी रद्दही होत आहे. आता आमदार, खासदारांचा दाखला मिळविणे सर्वसाधारण लोकांना कठीण जातेच शिवाय राजपत्रित अधिकारी असलेल्या तहसीलदारांकडूनही वेळेत दाखला मिळण्यात अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या शेतकरी मानधन योजनेसह शेतकरी सन्मान योजनेत नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे; परंतु पूर्वीच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असल्याने त्यांना नव्याने आधार नोंदणी करावी लागत आहे; परंतु ‘यूआयडी’च्या अटीमुळे त्यांची मोठी पंचाईत झाली आहे.


जन्मतारखेत एकदाच होणार बदल
‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाने’ केवळ जन्मतारखेसाठी दाखल्याचीच अट घातलेली नाही, तर जन्मतारखेतील बदलाच्या प्रमाणावरही मर्यादा आणली आहे. नव्या अटीनुसार एखाद्या व्यक्तीच्या आधार क्रमांकातील जन्मतारीख एकदाच बदलता येणार आहे. त्यातही जन्मतारखेत तीन वर्षांपेक्षा कमी फरकाचा बदल जिल्हास्तरावर आवश्यक कागदपत्रातून होणार आहे; परंतु त्यापेक्षा अधिक फरकाचा बदल करावयाचा असल्यास संबंधित व्यक्तीला थेट मुंबई येथील ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडिया’च्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.


आधार क्रमांक नोंदणी किंवा दुरुस्ती संदर्भातील नियम व अटी ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाच्यावतीनेच लागू करण्यात आल्या आहेत. या अटी देशभरात लागू आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर आपणाला यात काहीच करता येत नाही.
- सागर भुतडा
जिल्हा समन्वयक
महाआॅनलाईन, वाशिम

Web Title: Aadhar registration : class fail and illiterates people get problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.