वाशिम जिल्हास्तरीय समाधान शिबिरात ९५४ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:44 PM2019-09-04T13:44:14+5:302019-09-04T13:44:36+5:30

सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात रात्री ९.३० वाजेपर्यंत तब्बल ९५४ तक्रारी प्राप्त झाल्या.

954 complaints at Washim District Level Reconciliation Camp! | वाशिम जिल्हास्तरीय समाधान शिबिरात ९५४ तक्रारी!

वाशिम जिल्हास्तरीय समाधान शिबिरात ९५४ तक्रारी!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत ३ सप्टेंबर रोजी स्थानिक वाटाने लॉन येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय समाधान शिबिरात तक्रारींचा पाऊस पडला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात रात्री ९.३० वाजेपर्यंत तब्बल ९५४ तक्रारी प्राप्त झाल्या.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, धनंजय गोगटे, अनुप खांडे यांच्यासह सर्व तहसीलदार, विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून ९५४ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये पांदण रस्ता अतिक्रमणमुक्त करणे, वाहिवाटीचा रस्ता, सिंचन विहिरी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, पाणीपुरवठा योजना, वीज जोडणी, घरकुल, औषधी साठा उपलब्ध नसणे आदी विषयांच्या तक्रारींचा समावेश होता. न्याय प्रविष्ठ प्रकरणे वगळता उर्वरित तक्रारींवर यावेळी सुनावणी घेण्यात आली. ज्या प्रकरणांमध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात सुनावणी घेणे आवश्यक आहे, अशी प्रकरणांची सुनावणी विहित कालमर्यादेत पूर्ण करून प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
पांदन रस्ते, तसेच वाहिवाटीच्या रस्त्यांबाबतची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तहसीलदार, तालुका भूमिअभिलेख कार्यालय व पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही ना. राठोड यांनी दिले. मानोरा तालुक्यातील काही गावांमध्ये २०१८ मध्ये वादळी वाऱ्याने घरांचे नुकसान झाले. तेथील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदारांनी प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध नसल्याची तक्रार शिबिरात दाखल झाली होती. ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध ठेवण्याच्या सूचना ना. राठोड यांनी प्रशासनाला केल्या.
 

अशा आहेत तालुकानिहाय तक्रारी
समाधान शिबिरासाठी वाशिम तालुक्यातून १२६, मालेगाव तालुक्यातून ५३, रिसोड तालुक्यातून ७१, मंगरुळपीर तालुक्यातून १३६, कारंजा तालुक्यातून ४३० व मानोरा तालुक्यातून १३८ अशा एकूण ९५४ तक्रारी दाखल झाल्या. शेतीसाठी रस्ता मागणीसाठी दाखल प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून निर्णय द्यावा व ही प्रकरणे निकाली काढावीत, अशा सूचना पालकमंत्री ना. राठोड यांनी केल्या. या शिबिरात रात्री उशिरापर्यंत तक्रारी दाखल करणे सुरूच होते.

Web Title: 954 complaints at Washim District Level Reconciliation Camp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.