83 villages of Washim district has danger of flood | वाशिम जिल्ह्यातील ८३ गावांना पुराचा धोका
वाशिम जिल्ह्यातील ८३ गावांना पुराचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उन्हाचे प्रमाण कमी होत वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाळ्याची चाहुल लागली आहे. पावसाळ्यात वेळप्रसंगी उद्भवणाऱ्या पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात संभाव्य पुरबाधित ठिकाणे ८३ असून संबंधित गावांना पुराच्या तडाख्याची भिती लागून आहे. त्यादृष्टीने पुरनियंत्रणासाठी पुर्वनियोजन केले जात असून जलसंपदा विभागाकडून पुरनियंत्रण कक्षाची स्थापना देखील करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा हे सहाही तालुके अंशत: तापी खोºयात; तर पूर्णत: पैनगंगा उपखोºयात येतात. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी असली तरी तीचा उगम बुलडाणा जिल्ह्यातील अजिंठ्याच्या डोंगरांमधून होतो. पुढे ती वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातून वाहत चंद्रपूर जिल्ह्यातील वाढास्थित वर्धा नदीला मिळते. याशिवाय चंद्रभागा, अडाण, अरूणावती, गोदावरी, तापी, कांच, पूस या उपनद्याही जिल्ह्यातून वाहतात. तथापि, या नद्यांना पावसाळ्यात मोठा पूर आल्यास वाशिम तालुक्यातील तोंडगाव, केकतउमरा, आडगाव बु., गणेशपूर, तामसाळा, कोकलगाव, बोरखेडी, वारला, वाई, अडोळी, शिरपूटी, धुमका, जयपूर, उकळीपेन, कळंबा महाली, धानोरा खु. आदी गावे बाधीत होण्याची शक्यता अधिक असते. तसेच रिसोड तालुक्यातून वाहणाºया पैनगंगा, कांच नदीला पूर आल्यास अंचळ, नेतन्सा, गोवर्धन, मांगूळझनक, बोरखेडी, एकलासपूर, धोडप बु., देगाव, सरपखेड, गोहगाव, लिंगा कोतवाल, चिचांबापेन, किनखेडा, बाळखेड, आसेगाव पेन, देऊळगाव बंडा, वरूडतोडा, मोठेगाव, रिठद ही गावे बाधीत होतात. मंगरूळपीर तालुक्यातून वाहणाºया अडाण, अरूणावती, स्वासीन नदीला पूर आल्यास पिंपरी, गणेशपूर, शिवणी रोड, धोत्रा, जोगलदरी, कोळंबी, सावरगाव आणि मोझरी या गावांना धोका उद्भवू शकतो. मानोरा तालुक्यातून वाहणारी अरूणावती, पूस या नद्यांना पूर आल्यास मानोरा, कारखेडा, बोराळी, कोडोळी, साखरडोह, हिवरा बु., सिंगडोह, धामणी, गव्हा, विठोली, धावंदा, आसोला खु., वटफळ, इंगलवाडी, रुई, गोस्ता, आमगव्हाण, गिरोली ही गावे बाधीत होतात. कारंजा तालुक्यातून वाहणाºया बेंबळा नदीला पूर आल्यास पोहा, शिवणी बु., लाडेगाव, कामठा, ब्राम्हणवाडा, हिंगणवाडी, शिरसोली, बेलखेड, हिवरा लाहे या गावांना पुराचा वेढा पडू शकतो. तसेच मालेगाव तालुक्यातून वाहणाºया काटेपूर्णा आणि मोर्णा या नद्यांमुळे वाघी बु., तिवळी, बोराळा जहाँगीर, पांगराबंदी, मेडशी, पिंपळशेंडा, वाडी रामराव, दुबळवेल आणि वाकळवाडी ही गावे बाधीत होण्याची शक्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेवून संभाव्य पुरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चोख नियोजन केले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज- हिंगे
जिल्ह्यात प्रामुख्याने पैनगंगा नदीकाठच्या काही गावांना पुराचा वेढा पडू शकतो. त्यामुळे संबंधित सर्व गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. याशिवाय स्वस्त धान्य दुकानांमध्ये किमान ३ महिने पुरेल एवढा धान्य साठा साठवून ठेवण्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये पुरेसा औषधीसाठा देखील उपलब्ध करण्यात आला आहे. गावपातळीवरील ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकूणच पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी ‘लोकमत’ला दिली.


Web Title: 83 villages of Washim district has danger of flood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.