धोकादायक, खराब रस्त्याविरोधात तरुणांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 01:05 AM2019-10-16T01:05:13+5:302019-10-16T01:05:25+5:30

मूलभूत अधिकारानुसार तक्रार दाखल : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मागितली दाद

Youth Elgar Against Dangerous, Bad Roads | धोकादायक, खराब रस्त्याविरोधात तरुणांचा एल्गार

धोकादायक, खराब रस्त्याविरोधात तरुणांचा एल्गार

Next

पालघर : मनोर - वाडा - भिवंडी महामार्गावरील खड्ड्याने आतापर्यंत शेकडो निष्पाप बळी घेतले असून पालघर - बोईसर प्रमुख मार्गही खड्ड्यांमुळे धोकादायक बनला आहे. अशा असुविधांच्या विरोधात एकत्र येत आपल्या अधिकारांबाबत न्यायालयात दाद मागण्याचे सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठरविले आहे.


जिल्ह्यात वर्षानुवर्षे खराब तसेच खड्डेयुक्त रस्त्यांमुळे विविध ठिकाणी अपघातात अनेक निष्पापांचे बळी जाण्याचे सत्र काही कमी होताना दिसत नाही. विक्रमगडमधील रस्त्यांचे आयआयटीकडून स्पेशल आॅडिट करण्यात आले असताना आणि त्यात गंभीर बाबी दिसून आल्यावरही एकाही ठेकेदारविरोधात कोणीही कारवाई केलेली दिसत नाही.


जिल्ह्याती प्रमुख राज्य मार्ग, जिल्हा मुख्यालय ते औद्योगिक विकास महामंडळ तसेच शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावरून दररोज विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी ये-जा करीत असतात.
असे असूनही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. राज्य महामार्गाची अशी अवस्था असेल तर इतर रस्त्यांबाबत न बोललेच बरे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालघर जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच ‘आपले सरकार’ तक्रार निवारण अ‍ॅपमार्फत सदर निवेदन थेट मंत्रालयात पाठविण्यात आले आहे.

‘जगण्याचा मूलभूत अधिकार पायदळी तुडवला जातो’
भारतीय राज्य घटना अनुच्छेद २१ नुसार प्रत्येक भारतीयांस जगण्याचा तसेच व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. खराब, धोकादायक रस्त्यांमुळे जाणारे बळी पाहता आम्हा भारतीयांच्या ‘जगण्याचा मुलभूत अधिकार’ दररोज पायदळी तुडवला जात असतानाही आपण गप्प बसून आहोत. म्हणूनच आम्ही सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आमच्या अधिकाराबाबत दाद मागण्याचे ठरवल्याचे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथमेश प्रभूतेंडोलकर यांनी सांगितले.

Web Title: Youth Elgar Against Dangerous, Bad Roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.