वसईत वीकेंड लाॅकडाऊनची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:30 PM2021-04-17T23:30:47+5:302021-04-17T23:31:00+5:30

नागरिकांची ओसरली गर्दी : निर्बंधांबरोबरच उन्हाच्या प्रभावाने रस्ते सामसूम

Weekend lockdown status in Vasai | वसईत वीकेंड लाॅकडाऊनची स्थिती

वसईत वीकेंड लाॅकडाऊनची स्थिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : मागील आठवड्यात घेतलेल्या 'वीकेंड' लॉकडाऊनसारखेच चित्र शनिवारीही वसई-विरारमधील रस्त्यांवर होते; मात्र या शांततेसाठी निर्बंधांपेक्षा उन्हाचा 'प्रभाव' कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच वसई-विरार शहरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मात्र, मागील आठवड्यापासून उन्हाची काहिली थोडी जास्तच वाढली आहे. परिणामी वसई-विरारवासीय सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर पडणे टाळत आहेत.


एकीकडे सरकारने १४ एप्रिलपासून कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन संचारबंदीसारखे कडक निर्बंध लादले आहेत, तर मागील आठवड्यात 'वीकेंड लॉकडाऊन' घेतला होता. सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद 
म्हणून वसई-विरारकरांनी 'वीकेंड लॉकडाऊन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर सोमवारी मात्र वसई-विरार शहरात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रातच कोरोना रुग्ण वाढल्याने १४ एप्रिलपासून पुन्हा १५ दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे; मात्र सरकारचा हा निर्णय जनतेच्या पचनी पडलेला नसल्याने या आदेशानंतरही वसई-विरारमध्ये नियमांची पायमल्ली होताना दिसली. या दिवसांच्या तुलनेत शनिवारी मात्र मागील 'वीकेंड'सारखेच चित्र होते. मात्र, या शांततेसाठी 'निर्बंधां'पेक्षा उन्हाचा 'प्रभाव' कारणीभूत मानला जात आहे. 


वसई-विरार पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्वेला मोठ्या प्रमाणात दाटीवाटीचा परिसर आहे. संपूर्ण दिवसभरातील गर्मी, सततचा खंडित वीजपुरवठा आणि वाढत्या गर्मीसोबतच वाढणारी पाणीटंचाई, त्यात लागलेली संचारबंदी यामुळे आलेला उबग झटकण्यासाठी वसई-विरार-नालासोपारा परिसरातील नागरिक संध्याकाळी मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडताना दिसतात. विशेष म्हणजे मागील वर्षीदेखील मार्च-एप्रिल व मे महिन्यात शहरात असेच चित्र आणि परिस्थिती होती.


लोकांचे समुपदेशन होणे गरजेचे 
nबऱ्याच वेळा कोवीड-१९ चा रुग्ण स्वॅब दिल्यानंतर रिपोर्ट यायचा आहे म्हणून गावभर फिरत असतो. त्याच्यापासून अनेकांना लागण होत असते. ज्यांना कोविडची लक्षणे आहेत, अशा लोकांनी विलगीकरणात राहणे गरजेचे आहे. तर, एकाच कुटुंबात सर्व सदस्य बाधित निघाल्यावर त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एकतरी सदस्य बाहेर पडतो. अशा वेळी गृह विलगीकरणात असलेली व्यक्ती बाहेर फिरू नये यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे हाच सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. 
nही साखळी तोडण्याची जबाबदारी असलेली आरोग्य यंत्रणा कार्यालयातून बाहेर पडताना दिसत नाही. कोरोना रुग्णांच्या घरापर्यंत फक्त आशा वर्कर जाऊन माहिती भरत आहे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग तर होतानाच दिसत नाही. प्रत्येक कोरोना रुग्णांची हिस्ट्री तयार होऊन कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या मनात कोरोनाबाबत प्रचंड भीती असून लोकांनी कोरोना चाचणीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. यासाठी लोकांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Web Title: Weekend lockdown status in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.