आदिवासी महिलांना पाण्यासाठी करावी लागते पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:48 PM2021-02-21T23:48:07+5:302021-02-21T23:48:19+5:30

गेल्या अनेक वर्षात तालुक्यात नळपाणीपुरवठा योजनांवर करोडोचा खर्च करण्यात आला.

Tribal women have to pipe for water | आदिवासी महिलांना पाण्यासाठी करावी लागते पायपीट

आदिवासी महिलांना पाण्यासाठी करावी लागते पायपीट

Next

रवींद्र साळवे

मोखाडा : मुंबई राजधानीपासून १०० किमी अंतरावरील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका हा विकासापासून कोसो दूर आहे. येथील आदिवासींना पाण्यासाठी तीन किमीची पायपीट करावी लागत आहे. गेल्या अनेक अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी मोठमोठ्या आकड्यांची तरतूद केली जाते. परंतु खऱ्या अर्थाने येथील आदिवासींचा विकास होताना दिसत नाही. अनेक योजना कागदावरच राबवल्या जातात. यामुळे आदिवासींचा विकास हा फक्त प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या तोंडून ऐकायला मिळतो. 

गेल्या अनेक वर्षात तालुक्यात नळपाणीपुरवठा योजनांवर करोडोचा खर्च करण्यात आला, परंतु नावालाच राबवलेल्या योजनांमुळे आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाईची समस्या अद्याप सुटलेली नाही. तालुक्याच्या मुख्यालयाला लागून पाच किमी अंतरावर असलेले ३१३ आदिवासी लोकवस्तीचे चास हे गाव.

या ठिकाणी फेब्रुवारी महिना उजडताच भीषण पाणीटंचाईचा सामना  करावा लागत असून, तीन किमीचा डोंगर पार करून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. यामुळे येथील पाणीटंचाईचा प्रश्न  सोडवण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने ५५ लाख रुपये खर्चून २०१८ ते २०१९ मध्ये नळपाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे, परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे  हे काम अपूर्णच आहे.  या योजनेत फक्त विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले आहे, परंतु अजूनपर्यंत विहिरीवरून गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. 

यामुळे पुढील काळात तरी गावकऱ्यांना पाणी भेटेल का,  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच येथे टाकीच्या बांधकामाचा 
शुभारंभ करण्यात आला व खड्डा खोदून ठेवला आहे. मागील पावसाळ्यात या खड्ड्यात  गाय पडून जखमी झाली होती. यामुळे गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या वर्षीदेखील येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार नसल्याची चिन्ह आहेत. 

Web Title: Tribal women have to pipe for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.