सफाळे - पारगाव रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:24 PM2020-02-27T23:24:40+5:302020-02-27T23:24:43+5:30

आगरी समाज उन्नती मंडळाची मागणी; पावसाळ्यानंतर सुरू होणार काम

Safal - Pargaon Road awaiting demolition | सफाळे - पारगाव रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

सफाळे - पारगाव रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

Next

पारोळ : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोल नाका ते दारशेत गावाजवळून पारगाव, सफाळे भागात जाण्यासाठी महामार्गावरील सातिवली, दहिसरमार्गे फेरा मारावा लागतो. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरु झाल्या असून पावसाळ्यानंतर काम सुरु करण्यात येईल. हा रस्ता ३.७५ मीटर रुंदीचा असून एक पदरी असेल. यासाठी २.२५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून निविदा निघाली आहे.

पारगाव पोलीस चौकीपर्यंतचा रस्ता झाला तर महामार्गावरून सफाळे, पालघरकडे जायचे जवळपास १५ कि.मी.चे अंतर वाचणार आहे. यामुळे साहजिकच वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. या रस्त्यादरम्यान असलेल्या दुर्गम आदिवासी भागातील गावे - पाडे वस्त्या इतर भागाशी पक्क्या रस्त्याने जोडली जाणार आहेत. या रस्त्याची मागणी १९७६ पासून होत होती. दारशेतच्या पुढे हा रस्ता कच्चा असून आजही हा प्रस्तावित रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेतच आहे.

आगरी समाज उन्नती मंडळाने प्रथम १९७६ मध्ये खानिवडे येथील समाजाच्या अधिवेशनात खानिवडे, उंबरपाडा, दारशेत, सोनावे ते पारगाव अशा रस्त्याची मागणी केली होती. मात्र या रस्त्यासाठी मार्गामधील काही गावांनी विरोध केल्याने रस्ता रखडला. या रस्त्यासाठी १५ वर्षांपासून उन्नती मंडळ राजकीय नेते, संबंधित मंत्री, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या असून राज्य सरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नवे शासन स्थापन झाले आहे. आता हे नवे सरकार आमच्या मागणीचा विचार करेल, अशी आशा रहिवासी व्यक्त करत आहेत. आजही आमच्या गावात जाताना दर पावसाळ्यात तीन ते चार कि.मी. अंतर चिखलातून पार करावे लागत आहे. हा रस्ता झाला तर ही पायपीट संपून जाईल. त्यामुळे सरकारने हा रस्ता लवकर करावा, अशी विनंती येथील प्रवाशांनी केली आहे.

हा रस्ता दारशेतच्या पुढून महामार्गकडे वनखात्याच्या जागेतून जात आहे. तिकडे वनखात्याने डांबरीकरण करण्यास मनाई केली आहे. याबाबतचे त्यांचे पत्र आम्हाला आले असून जोपर्यंत त्यांची ना हरकत मिळत नाही तोवर रस्त्याचे काम मार्गी लागू शकत नाही. मात्र सोनावे ते दारशेतपर्यंत रस्त्याचे काम होणार आहे.
- महेंद्र किणी, उपअभियंता, बांधकाम विभाग, पालघर तालुका

रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, वनखात्याची काही अडचण निर्माण झाल्याने त्यांनी काम रोखले आहे. त्यांची मंजुरी मिळून लवकरच काम सुरु होईल असे समजले आहे.
- नरसिंह पाटील, सचिव, आगरी समाज उन्नती मंडळ

Web Title: Safal - Pargaon Road awaiting demolition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.