पालघर जिल्ह्यात भातलावणीची लगबग, कोरोनाच्या संकटामुळे मजूर मिळेनात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 02:05 AM2020-07-07T02:05:16+5:302020-07-07T02:05:52+5:30

वाडा/पारोळ : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच गावपाड्यांमध्ये भातपिकाच्या लावणीला शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सुरुवात केली ...

Paddy planting in Palghar district, worker not available due to corona crisis | पालघर जिल्ह्यात भातलावणीची लगबग, कोरोनाच्या संकटामुळे मजूर मिळेनात

पालघर जिल्ह्यात भातलावणीची लगबग, कोरोनाच्या संकटामुळे मजूर मिळेनात

googlenewsNext

वाडा/पारोळ : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच गावपाड्यांमध्ये भातपिकाच्या लावणीला शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सुरुवात केली आहे. कोरोनाच्या भीतीने मजूर कामावर येत नसल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे. दरवर्षी विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर येत असतात, मात्र या वर्षी कोरोनाचे महाभयंकर संकट आल्याने मजुरांनी येण्यास नकार दिल्याने स्थानिक पातळीवर प्रयत्न करून मजूर शोधून एका शेतमजुराला दररोज ३०० ते ३५० रुपये, सकाळी न्याहारी, दुपारी जेवण व रात्री पोस्त द्यावा लागतो. यामुळे या वर्षी कुटुंबाला पुरेल तेवढीच भातशेती लावण्याचा निर्णय बहुतांश शेतकऱ्यांनी घेतला आहे.
वाडा तालुक्यात १७६ गावे व २०० हून अधिक पाडे असून या वर्षी १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड होणार आहे. त्यापैकी २५० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाºयांनी दिली. तर २८० हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड होणार असून २०० हेक्टर क्षेत्रावर वरीची लागवड होणार आहे. या वर्षी तालुक्यात कुठेही खतांची टंचाई नसल्याचे तालुका कृषी अधिकाºयांनी सांगितले.
वाड्यातील शेतकरी झिनी-वाडा कोलम, वाडा कोलम-संकरित, सुरती, गुजरात-११, गुजरात-४, रत्ना, सुवर्णा, कर्जत, मसुरी आदी भातांच्या वाणांची लागवड यंदाही करून उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या वर्षी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे ५० टक्के सवलतींच्या दरात १०० क्विंटल कर्जत- ३, ६० क्विंटल कर्जत-५ याप्रमाणे तालुक्यातील १३७७ शेतकºयांना ३४४.२५ क्विंटल बियाण्यांचे वाटप करण्यात आले. मात्र ४२० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३४४.२० क्विंटलच बियाणे उपलब्ध झाले असल्याचे पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले.

विक्रमगडमधील शेतकरी भात लागवडीत व्यस्त
विक्रमगड : गेला जून महिना पूर्ण कोरडा गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. जूनच्या सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे शेतकºयांनी पेरणी आटोपून घेतली होती, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शेतकºयांची भात लागवड पावसाअभावी बाकी होती. रोपे तयार झाली होती, पंरतु पाऊस नव्हता. अखेर दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला व शेतात पाणी साचल्याने शेतकºयांनी भात लागवड करण्यास सुरुवात केली. तालुक्यात भात हे मुख्य पीक असून ८७५६ ूहेक्टरवर भातशेती केली जाते. या भागात जया, सुवर्ण, कर्जत ७, कर्जत १३, कोलम या जातीच्या भात बियाण्याची लागवड केली गेली आहे. पाऊस लांबला असला तरी समाधानकारक पाऊस पडल्याचे शेतकºयांनी सांगितले.

वसईकर शेतक-यांची स्थानिकांवरच मदार
पारोळ : वसई तालुक्यात उसंत घेतलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात रोपे तयार झालेल्या शेतकºयांनी भात लावणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र या वर्षी मजुरांची टंचाई भासत असून कोरोना महामारीमुळे दुसºया जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील मजूर शेतीच्या कामासाठी आणणे धोक्याचे असल्याने शेतकºयांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे आता भातलावणीसाठी स्थानिक मजुरांवर अवलंबून राहण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.
वसई तालुक्यात सर्वात जास्त भाताचे पीक घेतले जाते. यंदा भाताचे बियाणे, खते व मजुरांचे दर वाढल्याने शेतीचा खर्चही आवाक्याबाहेर गेला आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतात. शेतीचा खर्च भरून येत नसल्याने काही शेतकºयांनी आपली शेती दुसºया शेतकºयांना लावणीसाठी दिली आहे, तर काही शेतकरी गादीवाफे पद्धतीने भात लावणीची शेती करत आहेत.
काही भागात पडकई पद्धतीने दहा ते पंधरा शेतकºयांच्या समूहाच्या गटाने आळीपाळीने एकमेकांच्या शेतांमध्ये लागवड केली जाते. मात्र ही पद्धत आता कमी होत चालली आहे. यामध्ये ज्या शेतकºयांकडे भातलागवड असेल त्या शेतकºयाकडून दोन वेळच्या जेवणासह सर्व व्यवस्था केली जाते. त्यामुळे भातलागवड वेळेत होते. मजुरांची होणारी टंचाई दूर होते. सध्या शेतकरी कुटुंबासह भातलागवडीत मग्न झाला आहे. अनेक शेतकºयांनी जनावरे विकली असल्याने नांगरजोडी मिळत नाही. त्यामुळे अनेक जण नांगरणी करण्यासाठी पॉवर टिलरचा वा ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत.

बोलीवर यायचे मजूर
पूर्वी वसईत भातलावणीसाठी नाशिक येथील तसेच इतर ठिकाणचे मजूर यायचे. जोडीच्या मजुरीचा दर व किती दिवस काम या बोलीवर त्यांना आणले जाई. या वर्षी कोरोनामुळे बाहेरील जिल्ह्यातील, तालुक्यातील किंवा गावातील मजूर आणणे धोक्याचे आहे.

Web Title: Paddy planting in Palghar district, worker not available due to corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.