रब्बी लागवड लांबण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:57 AM2020-11-20T00:57:58+5:302020-11-20T00:58:15+5:30

ढगाळ हवामान : उत्पादनात घट ?

Likely to delay rabi planting | रब्बी लागवड लांबण्याची शक्यता

रब्बी लागवड लांबण्याची शक्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : तालुक्यात आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने परतीच्या पावसाने ओली झालेली जमीन सुकण्यात अडथळा येत आहे. दरम्यान, वापशाअभावी जमिनीच्या उखळणीची कामे मंदावल्याने पालघर जिल्ह्यातील रब्बी लागवड लांबण्याची शक्यता आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रब्बी लागवडीपूर्व प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली आहे.


मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा उलटूनही शेतजमिनीला वापसा आलेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता जमिनीची उखळणी करण्यात अडचण येत असून लागवड लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालघर जिल्ह्यात किनारपट्टी भागात हिरवी आणि ढोबळी मिरचीची आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. 


ही पिके प्रतिकूल हवामान बदलांना अधिक लवकर बळी पडते. जमिनीत ओलावा असल्यास मुळकुजव्या आणि अन्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढून रोपे रोगग्रस्त होऊन सरासरी उत्पादन घटते. शिवाय उन्हाळी कांदा बी पेरणी उशिरा होऊ शकते. त्यामुळे शेत पीक बाजारात उशिरा आल्यास दर कमी मिळतो.


मागील वर्षी परतीच्या पावसाने हंगाम लांबल्याने वांग्याच्या रोपांची वाढ झाली, मात्र त्याची फळधारणा खूपच कमी प्रमाणात झाली. वालाच्या शेंगांमध्ये दाणा चांगला भरलाही नव्हता. ही स्थिती कमी-अधिक फरकाने सर्वच पिकांबाबत सारखीच झाली होती. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना रब्बी लागवड पूर्व प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या हंगामातील पिके
पालघर जिल्ह्यात या हंगामात वाल, हरभरा ही कडधान्ये तसेच वांगी, मिरची, टोमॅटो या नगदी पिकासह वेलवर्गीय व मुळा, पालक, पातीचा कांदा इ. भाजीपाल्याची लागवड केली जाते. किनारपट्टी भागात हिरवी आणि ढोबळी मिरचीची आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. हे पीक प्रतिकूल हवामान बदलांना अधिक लवकर बळी पडते.
 

Web Title: Likely to delay rabi planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.