Hanuman Temple - Shivaji Chowk Road closed from today | हनुमान मंदिर - शिवाजी चौक रस्ता आजपासून बंद
हनुमान मंदिर - शिवाजी चौक रस्ता आजपासून बंद

पालघर : शिवाजी चौक पालघर ते हुतात्मा स्तंभ हा १ कोटी ६२ लाख किमतीचा रस्ता मंजूर झाला असून त्यातील हनुमान मंदिर ते शिवाजी चौक या रस्त्याच्या कामासाठी येथील वाहतूक १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.
शिवाजी महाराज चौक ते हनुमान मंदिर चौक ते हुतात्मा स्तंभ अशा या १.३५० किमी. लांबीच्या रस्त्यापैकी हुतात्मा स्तंभ ते हनुमान मंदिर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता सुमारे ५०० मीटर लांबी आणि ७ मीटर रुंदीच्या शिवाजी चौक रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्यावर नेहमीच आजूबाजूच्या इमारतीमधील ड्रेनेजचे पाणी येत असल्याने हा रस्ता लवकर खराब होतो. त्यामुळेच या पूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण असून या कामासाठी नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागासह नगरपरिषद प्रशासनाने यानिमित्ताने केले आहे
या मुख्य रस्त्यावर ११ जानेवारी ते १६ जानेवारी या ५ दिवसांत काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार होते. मात्र अनेक प्रयत्नानंतरही योग्य समन्वयाच्या अभावामुळे त्यातून मार्ग निघत नसल्यामुळे या रस्ता बांधणीचे काम त्यावेळी बारगळले होते. अलीकडेच नगरपरिषद पदाधिकारी, प्रशासन यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी प्रत्यक्षात पाहणी केली गेली. रस्ता बनण्यासाठी आवश्यक बाबी यांना नगरपरिषदेने मंजूर केल्यानंतर रस्त्याचे काम सुरू करण्याचे ठरले.
या भागात नगरपरिषदेच्या असलेल्या जलवाहिनी स्थलांतर करावयाच्या असून त्यानंतरच या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. यासाठी खबरदारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या ठिकाणी फलक व सूचना लावून तो १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०२० पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Hanuman Temple - Shivaji Chowk Road closed from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.