पारंपरिक समुद्र मत्स्यशेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:50 AM2019-11-13T00:50:24+5:302019-11-13T00:50:30+5:30

तालुक्यातील डहाणू आणि घोलवड समुद्रकिनारी दगडाचा बांध घालून पारंपरिक शेतीद्वारे ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांच्या काळात मासेमारी केली जाते.

 Disadvantages of traditional sea fisheries | पारंपरिक समुद्र मत्स्यशेतीचे नुकसान

पारंपरिक समुद्र मत्स्यशेतीचे नुकसान

Next

अनिरुद्ध पाटील 
डहाणू/बोर्डी : तालुक्यातील डहाणू आणि घोलवड समुद्रकिनारी दगडाचा बांध घालून पारंपरिक शेतीद्वारे ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांच्या काळात मासेमारी केली जाते. मात्र चक्रीवादळादरम्यान लाटांची तीव्रता वाढल्याने बांध आणि उभारलेले बांबू जाळींसह जमीनदोस्त झाल्याने मत्स्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
उत्तर कोकणातील महाराष्ट्र, गुजरात सीमा भागात वसलेल्या या तालुक्यातील चिखले आणि घोलवड या गावांना विशिष्ट भौगोलिक रचनेचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथे किनाºयापासून खोल समुद्राच्या दिशेने सुमारे शंभर एकर क्षेत्रावर खडकाळ भाग पसरला आहे. जमिनीचा समुद्रात शिरलेला चिंचोळा भाग आणि खडक यामुळे भरतीच्या पाण्यासह खोल समुद्रातील मासे किनाºयापर्यंत येतात. त्यांना पकडण्यासाठी ज्याप्रमाणे भात शेतीला बांधबंधिस्ती केली जाते, त्याप्रमाणे एक मच्छीमार समुद्रात एक-एक दगड रचून तीन ते चार एकरचे क्षेत्र मासेमारीसाठी तयार करतो. ओहोटीच्यावेळी पाणी ओसरू लागताच, या बांधांमुळे मासे शेती बाहेर पडू न शकल्याने छोट्या-छोट्या खड्ड्यांमध्ये राहतात. त्यानंतर वीत-दीडवीत पाणी पातळी झाल्यावर मासे जाळ्याच्या सहाय्याने पकडले जातात. शेकडो वर्षांपासून येथे सापळा पद्धतीची पारंपरिक मत्स्यशेती केली जाते.
भात शेतीप्रमाणेच समुद्रातील ही शेती कुटुंबातील एका पिढीकडून दुसºया पिढीकडे हस्तांतरित होते. गावात अशी मोजकीच कुटुंबे असून त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते. तर वर्षभर ओली आणि सुकी मासळी घरगुती स्वयंपाक आणि विक्रीकरिता उपलब्ध होत असल्याने कुटुंबाचे अर्थकारण चांगले चालते.
या प्रकारच्या शेतीच्या बांधबंधीस्तीचे काम गणेशोत्सवानंतर हाती घेतले जाते. अनंतचतुर्दशी ते सर्वपित्री अमावस्येपर्यंतच्या या काळात समुद्रातील ओहटीचे गणित सांभाळून दिवसातील चार-पाच तासात दगडावर-दगड रचून बांध घातला जातो. याकरिता प्रतिवर्षी २५ ते ३० हजारांचा मजुरीचा खर्च येतो. तर तेवढाच खर्च बांबू, जाळी यांना येत असून ही साधनसामुग्री पुढील चार-पाच वर्ष वापरता येते. भांगाची भरती वगळता आॅक्टोबर ते मे या आठ महिन्यात प्रतिदिन येणाºया दोन ओहटीच्यावेळी मासेमारी केली जाते.
>हिवाळ्यातील मासेमारीपासूनही वंचित
गेल्या दशकापासून या बांधालगत बांबू उभारून त्यावर सहा ते आठ फूट उंचीचे जाळे लावले जाते. त्यामुळे छोट्या आकारातील मासेमारी करणेही सोपे झाले आहे. या पद्धतीमुळे बांधबंधीस्तीकरिता वेळ कमी लागतो. मात्र मोठ्या माशांचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती चिखले गावच्या वडकतीपाडा येथील मत्स्य शेतकरी सुजय मोठे यांनी दिली. दरम्यान, दोन चक्रीवादळामुळे लाटांची तीव्रता वाढल्याने बांधावर रचून ठेवलेले दगड खाली पडले आहेत. तर बांबू आणि जाळी जमीनदोस्त झाली. त्यामुळे पुन्हा हे काम हाती घ्यावे लागणार असून मजुरीवर खर्च होणार आहेत. तर हिवाळ्याच्या पहिल्या हंगामात येणाºया मासेमारीपासून वंचित राहावे लागून आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
>जिल्ह्यातील

110
कि.मी. लांबीच्या समुद्रकिनारी अनेक भागात खडक आहेत. मात्र चिखले, घोलवड गावात या पद्धतीची मत्स्यशेती शेकडो वर्षांपासून केली जाते. पावसाळ्यातील भात शेती व्यतिरिक्त आठ महिन्यातील हा जोडधंद्यामुळे एका कुटुंबाची गुजराण चांगल्या प्रकारे होते. कोळंबी, खेकडे, भामट, मागन, जिताडे, माकली, बोय अशा नानाविविध शेकडो जातींचे मासे हे ऋतू आणि समुद्री परिसंस्थेनुसार मिळतात. त्यामुळे या कुटुंबासह पंचक्र ोशीत ताज्या माशांची गरज भागवली जाते.
>‘‘चक्र ीवादळामुळे समुद्रात लाटांची तीव्रता वाढून चिखले आणि घोलवड गावातील सुमारे ४० ते ५० पारंपरिक मत्स्य शेतकऱ्यांचे सरासरी २५ ते ३० हजारांचे नुकसान झाल्याने कुटुंबाचे अर्थकारण बिघडणार आहे. ही आगळी-वेगळी मत्स्यशेती शेकडो वर्षांपासून आमचे कुटुंबीय करीत असून हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत टिकवायचा असल्यास आम्हालाही नुकसान भरपाई मिळायला हवी.’’
- कमलेश जोंधलेकर, पारंपरिक मत्स्य शेतकरी, चिखले गाव

Web Title:  Disadvantages of traditional sea fisheries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.