प्रशासनाच्या निर्णयामुळे सुखावले चिकू बागायतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:59 AM2021-04-10T00:59:41+5:302021-04-10T00:59:49+5:30

चिकू निर्यातीचा मार्ग मोकळा

Chiku gardeners happy with the administration's decision | प्रशासनाच्या निर्णयामुळे सुखावले चिकू बागायतदार

प्रशासनाच्या निर्णयामुळे सुखावले चिकू बागायतदार

googlenewsNext

- अनिरुद्ध पाटील

बोर्डी : चिकू फळांची तोडणी ते निर्यात हे काम सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चालते. कृषी उत्पादनांचा समावेश अत्यावश्यक सेवेत असला तरी नियमांमुळे फळे बाजारात पाठविणे अशक्य होते. मात्र डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बागायतदारांच्या भावना समजून घेऊन कामकाजाला परवानगी दिली. त्यामुळे चिकू फळाचा निर्यातीचा मार्ग मोकळा झाल्याने प्रतिदिन चाळीस लाखांचे नुकसान टळल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चिकू फळाच्या प्रत्येक फळाची झाडावर चढून तोडणी केल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून, वर्गवारी केल्यानंतर पॅकेजिंग केले जाते. त्यानंतर वाहनात भरून त्याची निर्यात केली जाते. परंतु फळांची तोडणी आणि धुण्याची प्रक्रिया करण्यासाठी संध्याकाळ होते. शिवाय सायंकाळी ६ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत वर्गवारी तसेच पॅकेजिंगचे काम चालते. मात्र ‘ब्रेक द चेन’ मोहिमेनुसार रात्री ८ ते सकाळी ७ वाजता जमावबंदीचा सामना करावा लागतो. शिवाय सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन न केल्यास दंडाची रक्कम वसूल केली जाते. त्यामुळे चिकू निर्यातीला अडथळा निर्माण झाला होता. डहाणू आणि तलासरी तालुक्यातून प्रतिदिन २२० ते २३० टन उत्पादन निघते. त्यामुळे बागायतदारांचे सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले असते.

ही अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर चिकू उत्पादक, मजूर, वाहतूकदार यांना मोठा आर्थिक फटका बसला असता. याबाबत बोर्डीतील चिकू बागायतदार प्रीत पाटील यांनी तत्काळ डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना कल्पना दिली. कोविड नियमांचे पालन करून सायंकाळपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याची सूचना मित्तल यांनी केली, मात्र चिकू तोडणी ते पॅकेजिंगनंतर वाहनातून किंवा डहाणू रोड रेल्वेस्थानकातील कृषी स्पेशल रेल्वे गाडीच्या डब्यात चिकू फळांचे बॉक्स ठेवण्यापर्यंतची माहिती सविस्तरपणे अधिकाऱ्यांना पटवून देण्यात प्रीत यशस्वी ठरले. त्यानंतर पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर मित्तल यांनी बागायतदारांना परवानगी दिली आहे. 

जीवनावश्यक वस्तूंमध्ये शेतमालाचा समावेश असला तरी चिकूची तोडणी ते पॅकेजिंगनंतर निर्यातीसाठी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत काम चालते. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे अंतर राखले जाईलच असे नव्हे, मात्र या प्रक्रियेत समाविष्ट असणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझिंग इ.नियमाचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय खऱ्या अर्थाने चिकू उत्पादकांसाठी दिलासादायक ठरला आहे. 
       - प्रीत पाटील, 
               चिकू बागायतदार, बोर्डी

Web Title: Chiku gardeners happy with the administration's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.