तारापूरच्या ‘त्या’ उद्योगांवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:10 PM2019-12-15T23:10:20+5:302019-12-15T23:11:00+5:30

उद्योग जगतात खळबळ : उद्योगांचा वीज व पाणीपुरवठा ७२ तासांत खंडित

Ban on 'those' industries of Tarapur | तारापूरच्या ‘त्या’ उद्योगांवर बंदी

तारापूरच्या ‘त्या’ उद्योगांवर बंदी

Next

पंकज राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे विभागाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी ‘उत्पादन बंद’ची कारवाई सुरू केली असून बंद केलेल्या उद्योगांचा वीज व पाणीपुरवठा ७२ तासांत खंडित करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात अनेक उद्योगांवर कारवाई होण्याच्या शक्यतेमुळे उद्योग जगतात खळबळ माजली आहे.


तारापूर एमआयडीसीमधील अनू फार्मा लि. आणि आरती इंडस्ट्रीज लि. या उद्योगांवर बंदीची कारवाई करण्यात आली असून या बंद केलेल्या दोन उद्योगांवर बजावण्यात आलेल्या क्लोजर डायरेक्शनच्या नोटिशीमध्ये उत्पादन प्रकिया करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या संमती पत्रकानुसार कार्यवाही किंवा अंमलबजावणी होत नसून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे म.प्र.नि. मंडळाच्या अधिकाºयांनी आॅक्टोबरच्या दुसºया आठवड्यात केलेल्या पाहणीदरम्यान निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांतून तसेच २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सी.ई.टी.पी.) लाखो लिटर रासायनिक प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया न करताच बिनदिक्कतपणे नाल्यात, गटारात, शेत जमिनीत तसेच नवापूरच्या खाडी किनारी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर हवेतही विषारी व दुर्गंधीयुक्त वायू सोडण्यात येत असल्याने परिसरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


तारापूर येथील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे (एन.जी.टी.) याचिका दाखल केल्यानंतर मागील दोन वर्षात लवादासमोर अनेक वेळा सुनावणी झाल्या. त्यामध्ये लवादाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी आणि विशेष तपासणी मोहीम राबविली.


याबरोबरच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून पाहणीही करण्यात आली असून ही प्रक्रिया सुरूच आहे, तर जुलैमध्ये तारापूर औद्योगिक वसाहत संपूर्ण देशात प्रदूषणात प्रथम क्रमांकावर आल्यानंतरही प्रदूषण नियंत्रणात फारशी सुधारणा होत नसल्याने आश्चर्य व संतापही व्यक्त करण्यात येत आहे.

कारवाईचा फार्स नको : ग्रामस्थांची मागणी
च्तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राज्यातील विविध भागातील अधिकाºयांद्वारे विशेष पथकाद्वारे तपासणी मोहीम राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतर दोन टप्प्यात नुकतीच करण्यात आली. या पथकाने तारापूर औद्योगिक क्षेत्रांमधील लाल व नारिंगी अशा सुमारे पाचशे उद्योगांमधील रासायनिक सांडपाणी व हवा प्रदूषण यासंदर्भात विशेष सर्वेक्षण केले.
च्या सर्वेक्षणाचा अहवाल आता प्राप्त होऊ लागल्याने जे उद्योग दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होणार असली तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मागील चार-पाच दशकांत तारापूर येथील अनेक उद्योगांवर कारणे दाखवा नोटीस, प्रस्तावित निर्देश, अंतरिम आदेश व त्या नंतर उत्पादन बंद अशा हजारो नोटिसा बजावण्यात आल्या, परंतु कायद्यातील पळवाटा शोधून अनेक मार्ग काढून पुन्हा ते उद्योग सुरू होत आहेत.
च्काही उद्योगांना तर अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने पर्यावरणासंदर्भातील कायद्यांचा धाक फारसा राहिला नसल्याने तारापूर येथील प्रदूषणाची समस्या आजही कायम आहे. त्याकरिता आता कारवाईचा फार्स नको तर ठोस कारवाई करून जास्तीत जास्त प्रमाणात तारापूर औद्योगिक परिसर प्रदूषणमुक्त करा, अशी मागणी नागरिकांकडून
होत आहे.

Web Title: Ban on 'those' industries of Tarapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.