पालघरात माशांची आवक घटली; क्यार चक्रीवादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:26 PM2019-10-31T23:26:32+5:302019-10-31T23:27:12+5:30

भात कापणीसाठी खलाशी आले माघारी

The arrival of fish in Palghar declined; Hurricane strike | पालघरात माशांची आवक घटली; क्यार चक्रीवादळाचा तडाखा

पालघरात माशांची आवक घटली; क्यार चक्रीवादळाचा तडाखा

Next

पालघर : जिल्ह्यातील वसई ते झाई-बोर्डी या ११० किमी. च्या किनारपट्टीवरील बहुतांशी बंदरातील मासेमारी दिवाळीमुळे तर क्यार चक्रीवादळाच्या तडाख्याने बंद आहे. त्यामुळे बाजारातील माशांची सर्व स्तरावरून आवक घटल्याने मत्स्यप्रेमींची अडचण झाली आहे.
जिल्ह्यातील अर्नाळा, नायगाव, वसई, वडराई, केळवे, नवापूर, उच्छेळी-दांडी, डहाणू आदी मच्छीमारी गावातून मत्स्यप्रेमींना बोंबील, कोळंबी आदी ताज्या मासळीचा पुरवठा केला जातो. तर वसई, नायगाव, अर्नाळा, सातपाटी, मुरबे, डहाणू आदी बंदरातून पापलेट, घोळ, दाढा, सुरमई, हलवा आदी माशांचा मोठा पुरवठा होत असतो. परंतु २५ तारखेपासून दिवाळी असल्याने दोन दिवसांपूर्वीच समुद्रात मासेमारीला गेलेल्या सर्व बोटी बंदरात माघारी आल्या होत्या. तसेच सातपाटी, मुरबे, डहाणू, वसई आदी भागातील बोटीत विक्र मगड, तलासरी, मनोर, जव्हार, डहाणू आदी ग्रामीण भागातील ४ ते ५ हजार आदिवासी बांधव खलाशी कामगार म्हणून काम करतात. ते सर्व दिवाळी सणासाठी आणि आपल्या शेतातील भात कापणीच्या कामासाठी घरी परतले आहेत. दिवाळी संपली असली तरी परतीच्या पावसाने कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचे नुकसान झाल्याने बोटीतील खलाशी कामगार मासेमारीसाठी बोटीत जाण्यास तयार नाही. तर दुसरीकडे क्यार चक्र ीवादळाच्या तडाख्याने समुद्र घुसळून निघाल्याने माशांचे थवे दडून बसत असल्याने मच्छीमार समुद्रात मासेमारीला जाण्याची जोखीम पत्करायला तयार होत नाहीत. खलाशांचा प्रत्येकी १२ ते १५ हजार महिना पगार, डिझेल, बर्फ, जीवनावश्यक सामग्री आदी सुमारे दीड लाखाचा खर्चही भरून काढणे शक्य होणार नसल्याच्या भीतीने मच्छीमार मासेमारीला जाण्याचे धाडस पत्करण्यास तयार होत नसल्याचे मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजन मेहेर यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या ९ दिवसापासून पूर्णत: मासेमारी ठप्प पडून आहे. अजूनही ढगाळलेले वातावरण आणि मध्येच पाऊस कोसळत असल्याने मासेमारीचे दिवस वाया जात आहेत. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरायचे कसे हा प्रश्नही मच्छीमाराना सतावत आहे.

जिल्ह्यातील मासेमारी गावांव्यतिरिक्त मुंबईच्या छत्रपती मंडई (क्र ॉफर्ड मार्केट) इथे ओखा, पोरबंदर, हावडा (कलकत्ता), रत्नागिरी येथून मोठ्या प्रमाणात मासे मुंबईसह अन्य शहरात विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. परंतु क्यार वादळाचा तडाखा बहुतांशी किनारपट्टीला बसल्याने माशांची आवक घटली आहे. परिणामी खोल खाडीतील बोंबील मासे काही प्रमाणात उपलब्ध होत असून मत्स्यप्रेमींना नाईलाजाने त्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. तर हॉटेल व्यावसायिकांना पापलेट, सुरमई आदी ताजा माशांचा पुरवठा होत नसल्याने शीतगृहात साठवलेल्या माशांवर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे.

४ नोव्हेंबरपर्यंत क्यारचा धोका
समुद्रात घोंघावत असलेल्या क्यार चक्रीवादळाचा धोका हा ४ नोव्हेंबरपर्यंत राहणार असल्याने समुद्रात मासेमारीला गेले असल्यास तत्काळ माघारी येण्याचे पत्र सहा. मत्स्यव्यवसाय आयुक्त, पालघर - ठाणे यांनी दोन्ही जिल्ह्यातील सहकारी संस्थांना पाठवले आहे. त्यामुळे अजून ४ दिवस बोटी समुद्रात जाऊ शकणार नसल्याने मासळीची आवक पूर्णत: बंद पडणार आहे. यामुळे सध्या उपलब्ध माशांचे भावही चढे आहेत. ५० रु पयांना ५ मिळणाऱ्या बोंबील माशाच्या दराने उचल खात १०० रु पयांना ५ बोंबील असा सध्या भाव सुरू आहे.

Web Title: The arrival of fish in Palghar declined; Hurricane strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.