90 crores of property tax collected | मालमत्ताकराची ९६ कोटींची केली वसुली
मालमत्ताकराची ९६ कोटींची केली वसुली

नालासोपारा : वसई विरार महापालिकेने २०१८-२०१९ मध्ये विक्र मी मालमत्ता कराची वसुली केली होती. त्यानुसार यंदाही त्याहून अधिक कराची वसुली करण्यासाठी वसई विरार महापालिका सज्ज झाली असून आतापर्यंत या सहा महिन्यात ९६ कोटींची मालमत्ता कराची वसुली करण्यात आली आहे.
वसई विरार शहरात ७ लाख ४२ हजार औद्योगिक व वाणिज्य असे मालमत्ताधारक आहेत. मालमत्ता कराची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१९ असून नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर ९६ कोटींचा टप्पा पालिकेने पूर्ण केला आहे. गेल्यावर्षी ८१ कोटी ५४ लाख इतका कर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाला होता.
त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १५ कोटींची जादा वसुली झाल्याचे पालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना आणि सर्व कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ही करवसुली थंडावली, असे वाटत होते. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा टप्पा गाठला असून पुढे मार्चपर्यंत ३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवल्याचे पालिकेने सांगितले.
।विशेष मोहीम हाती घेणार
३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर भरण्याची मुदत असणार असून त्यानंतर २ टक्के दंड लाऊन कराची रक्कम वसूल करण्यात येईल. तसेच कर भरण्यासाठी नागरिकांना सूचित करण्यात येईल. तसेच यासह कर्मचारी आणि अधिकारी यांचे पथक तयार करून विशेष मोहीम काही दिवसात हाती घेण्यात येईल, असेही तळेकर यांनी सांगितले.
२०१८-२०१९ मध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने या वर्षी कंबर कसली होती. त्याचे फळ पालिकेला मिळाले होते. ३१ मार्चपर्यंत एकूण २२१ कोटींची मालमत्ता कराची वसुली पालिकेतर्फे करण्यात आली होती. २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात पालिकेने १६४ कोटी रूपये इतका मालमत्ता कर वसूल केला होता.

Web Title: 90 crores of property tax collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.