रोडरोमिओंना आवरणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:07 PM2019-07-23T22:07:26+5:302019-07-23T22:07:50+5:30

दादाजी धुनिवाले चौक आणि बॅचलर रोडच्या दुतर्फा रोडरोमिओ, गुन्हेगारी प्रवृत्तीने गत काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. यामुळे रहिवासी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रोडरोमिओ, टवाळखोरांना बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Who will cover the Roadroms? | रोडरोमिओंना आवरणार कोण?

रोडरोमिओंना आवरणार कोण?

Next
ठळक मुद्देधुनिवाले चौक, बॅचलर रोड : रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दादाजी धुनिवाले चौक आणि बॅचलर रोडच्या दुतर्फा रोडरोमिओ, गुन्हेगारी प्रवृत्तीने गत काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. यामुळे रहिवासी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रोडरोमिओ, टवाळखोरांना बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
दादाजी धुनिवाले चौकापासून आर्वी नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरण पूर्णत्वास गेले आहे. मार्गाच्या दुतर्फा पादचाऱ्यांकरिता पदपथ (फुटपाथ) तयार करण्यात आला आहे. मात्र, हे पदपथ टवाळखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीने ताब्यात घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पदपथावरच अनेकांनी अतिक्रमण करीत व्यवसाय थाटले आहे. शिवाय, मार्गालगतच एक कॅफे असून येथेही प्रेमीयुगुलांची सायंकाळनंतर गर्दी उसळते. धुनिवाले चौकात पेट्रोलपंप परिसरात पानठेले व खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचा घेत तरुणांकडून मद्याचे घोटही रिचविले जातात. येथेच युवकांचे टोळके रात्री उशिरापर्यंत टवाळखोरी करताना दिसून येतात. याचा मार्गाने ये-जा करणाऱ्यांसह रहिवासी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शिकवणी वर्गावरून येणाऱ्या तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. याकडे शहर पोलिसांचे दुर्लक्ष होत असून पोलिसांचा कारभार कारभार ढेपाळल्याने हा विभाग अस्तित्वात आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती, टवाळखोर युवकांचा बंदोबस्त करावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील रहिवासी नागरिक, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
महिनाभरापूर्वी झाला चाकूहल्ला
धुनिवाले चौकात पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या पानठेल्यावर टोळक्यातील युवकांनी यथेच्छ मद्यप्राशन केले. यानंतर क्षुल्लक कारणावरून वाद उफाळून आला आणि त्याचे पर्यवसान युवकावर चाकूहल्ला करण्यात आले. यात युवक गंभीर जखमी झाला. दरम्यान, काही काळ चौकात भीतीचे वातावरण होते. पोलिस विभाग या घटनेपासूनही अनभिज्ञ दिसून आला.
धुनिवाले चौकात अनेकांकडून खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, पानठेले लावून पदपथावर अतिक्रमण करण्यात आले आहे. या गाड्यांवर सायंकाळनंतर प्रचंड गर्दी उसळते. मात्र, ग्राहकांकडून वाहने अर्ध्या रस्त्यापर्यंत उभी केली जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून दररोज वाहतूक व्यवस्था कोलमडते. येथे अपघाताची शक्यताही बळावली आहे. याकडे वाहतूक नियंत्रक पोलिसांना कानाडोळा आहे.
बेफाम वाहने पिटाळणाऱ्यांचा हैदोस
धुनिवाले चौक ते आर्वी नाका रस्ता गुळगुळीत झाला आहे. याचा फायदा घेत युवकांकडून बेफाम वाहने पिटाळली जातात. हे चित्र येथे दररोजच पाहायला मिळते. याकडेही कुणी लक्ष द्यायला तयार नसल्याने अपघाताची मोठी घटना घडण्याची भीयी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
चार्ली पथके गेली कुठे?
काही वर्षांपूर्वी गुन्हेवारी वृत्तीवर वॉच ठेवण्याकरिता चार्ली पथके तयार करण्यात आली होती. शहरातील विविध भागात ही पथके गस्त घालत होती. ही पथकेही सद्यस्थितीत गुंडाळण्यात आली आहे. यामुळे असामाजिक प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. पोलीस प्रशासनाचा धाकच राहिलेला नसल्याने बॅचलर रोड परिसरात अनुचित घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Who will cover the Roadroms?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.