कुऱ्हा लघु जलाशयाला तडे; ४२ कुटुंबांना हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 06:00 AM2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:06+5:30

जलाशयाच्या भिंतीला तडे गेल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती तलाठ्यांना दिली. त्यांनी सदर माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन बाऱ्हा सोनेगाव येथील ४२ कुटुंबांना रसुलाबाद येथील विठ्ठल रुख्मिणी देवस्थानात हलविण्यात आले आहे.

The well breaks into a small reservoir; Moved 2 families | कुऱ्हा लघु जलाशयाला तडे; ४२ कुटुंबांना हलविले

कुऱ्हा लघु जलाशयाला तडे; ४२ कुटुंबांना हलविले

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी केली पाहणी । जिल्हाधिकाऱ्यांसह अधीक्षक अभियंत्यांना सादर करणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/विरूळ (आकाजी) : रसुलाबाद नजीकच्या कुऱ्हा जलाशयाच्या भिंतीला तडे गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच लघु जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या बाºहा सोनेगाव येथे कोलाम बांधवांची वस्ती असून संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील ४२ कुटुंबांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. जलाशयाच्या भिंतीला तडा गेल्याची माहिती मिळताच वर्धा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. पाटबंधारे विभाग आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना सादर करणार आहे.
जलाशयाच्या भिंतीला तडे गेल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती तलाठ्यांना दिली. त्यांनी सदर माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन बाऱ्हा सोनेगाव येथील ४२ कुटुंबांना रसुलाबाद येथील विठ्ठल रुख्मिणी देवस्थानात हलविण्यात आले आहे. या संकटाच्या प्रसंगी रसुलाबादवासीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सदर कुटुंबांना आपल्या परिवारातील सदस्य असल्याचे सांगत प्राथमिक सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या. शिवाय त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात येत असल्याचे रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी सांगितले.
तर सदर घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार गायकवाड, वर्धा पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. बी. काळे, नायब तहसीलदार शकुंतला पाराजे, पाटबंधारे विभागाचे दामोधरे, मेश्राम, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, हुसेनपूरचे सरपंच रवी कुरसंगे, तलाठी भोले, पोलीस पाटील श्याम काकडे यांनी कुऱ्हा जलाशयाच्या तडे गेलेल्या भिंतीची पाहणी केली. शिवाय नागरिकांशी संवाद साधला. वर्धा पाटबंधारे विभाग कुऱ्हा जलाशयाच्या पाहणीनंतर आपला अभिप्राय देणारा अहवाल तयार करून तो तातडीने त्यांच्या विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांसह जिल्हाधिकाºयांना सादर करणार आहे.

जलाशय भरला १०० टक्के
रसुलाबाद नजीकच्या बाऱ्हा सोनेगाव व कुरझडी या गावांच्या मधात कुऱ्हा हा लघु जलाशय आहे. सुमारे ३७ हेक्टरवर पसरलेल्या या जलाशयाची एकूण पाणी साठवण क्षमता ३ दलघमी असून तो सध्या १०० टक्के भरला आहे. अशातच पूर्णपणे मातीने तयार करण्यात आलेल्या या जलाशयाच्या भिंतींना तडे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुरझडीवासीयांनाही सुरक्षित ठिकाणी हलविणार?
कुºहा जलाशयापासून बाऱ्हा सोनेगाव हे गाव अवघ्या अर्धा किमी अंतरावर आहे. तर कुरझडी हे गाव सुमारे ४ किमी अंतरावर आहे. सध्या बाऱ्हा सोनेगाव येथील ४३ कुटुंबातील एकूण १४३ जणांना रसुलाबाद येथील सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. तर वेळप्रसंगी कुरझडीवासीयांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात येणार आहे. कुरझडी या गावाची लोकसंख्या १ हजार २०० इतकी असून त्यासाठीची तयारी महसूल विभागाने पूर्ण केली आहे. शिवाय वाहनही सज्ज करण्यात आले आहे.

पाणी सोडण्याचा विषय विचाराधीन
कुऱ्हा जलाशय सध्या १०० टक्के भरला असून या जलाशयाच्या भिंतीला तडा गेल्याचे पुढे आले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी विविध पैलूंनी विचार केल्या जात असून वेळप्रसंगी धरणातून पाणीही सोडले जाणार आहे.

नायब तहसीलदार तळ ठोकून
कुऱ्हा जलाशयाच्या भिंतीला तडे गेल्याची माहिती मिळताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी आपल्या चमूसह शुक्रवारी रात्री रसुलाबाद गाठले. शिवाय त्या तेथे दुपारी उशीरापर्यंत तळ ठोकून होत्या. बारीक सारीक बाबींची माहिती जाणून घेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
‘त्या’ ब्लास्टमुळे ओढवली परिस्थिती?
कुऱ्हा जलाशयाच्या निर्मितीला सुमारे ४० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. याच तलावाच्या शेजारी जिल्हा परिषदेच्यावतीने विहीर खोदण्यात आली. त्यासाठी तेथे ब्लास्ट करण्यात आले होते. त्याचाच परिणाम सध्या या जलाशयाचा भिंतीवर झाल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे.

Web Title: The well breaks into a small reservoir; Moved 2 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण