सीसीआय अन् पणनचे खरेदी केंद्र उघडूनही कापसाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 05:00 AM2020-11-29T05:00:00+5:302020-11-29T05:00:07+5:30

अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सीसीआयच्या निर्देशानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी केली होती. दिवाळीच्या सुरूवातीला देवळी येथे सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या सर्व भागात खरेदी केंद्र सुरू झाले. शेतकऱ्यांना बाजार समितीतून कापूस आणण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत. मात्र, शेतकरी कापूस आणत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील जवळपास २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने कपाशीचे पीक उपटून टाकले असून त्याठिकाणी चणा किंवा गहू लागवडीची तयारी सुरू केली आहे.

Waiting for cotton even after opening CCI Marketing Shopping Center | सीसीआय अन् पणनचे खरेदी केंद्र उघडूनही कापसाची प्रतीक्षाच

सीसीआय अन् पणनचे खरेदी केंद्र उघडूनही कापसाची प्रतीक्षाच

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात सीसीआयने खरेदी केला केवळ ५९ हजार क्विंटल कापूस

    लाेकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने यंदा कपाशीच्या उत्पादनात कमालीची घट येत आहे. अनेक शेतकरी कपाशी पीक रोटावेटरच्या सहाय्याने उपटून टाकले आहे. त्यामुळे कापूस पणन महासंघ व सीसीआय या दोघांचीही कापूस खरेदी केंद्र सुरू झाली असतानाही तेथे कापसाची आवक मंदावलेली आहे.
अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सीसीआयच्या निर्देशानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी केली होती. दिवाळीच्या सुरूवातीला देवळी येथे सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या सर्व भागात खरेदी केंद्र सुरू झाले. शेतकऱ्यांना बाजार समितीतून कापूस आणण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत. मात्र, शेतकरी कापूस आणत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील जवळपास २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने कपाशीचे पीक उपटून टाकले असून त्याठिकाणी चणा किंवा गहू लागवडीची तयारी सुरू केली आहे. सीसीआयची खरेदी सुरू होऊन आठवडा लोटला आहे. सीसीआयने जिल्ह्यात देवळी बाजारसमितीअंतर्गत २० हजार ३२० क्विंटल, वर्धा बाजार समिती अंतर्गत १० हजार ४६७ क्विंटल, सेलू बाजार समितीअंतर्गत ४ हजार ३५८ क्विंटल, हिंगणघाट बाजार समिती अंतर्गत २० हजार क्विंटल, समुद्रपूर बाजार समिती अंतर्गत ३ हजार ७७० तर आर्वी बाजार समिती अंतर्गत ६०० क्विंटल कापसाची खरेदी शुक्रवारपर्यंत केलेली आहे. 
जिल्ह्यात कापूस पणन महासंघाचे केंद्र पुलगाव व तळेगाव येथे सुरू झाले आहे. तेथेही अत्यल्प आवक असल्याची माहिती आहे. यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. पहिला वेचा झाल्यानंतर आता दुसरा वेचा शेतकऱ्यांना रोजाने महिला मजूर सांगून करावा लागत आहे. दोन वेच्यानंतर कापूस पट्टयातील अनेक गावात कपाशीची उलंगवाडी होणार आहे. रोजंदारी महिला मजुरांमार्फत कापूस वेचणी परवडणानी नसल्याने अनेकांनी कपाशी काढून टाकली आहे. जिल्ह्यात १ हजार ते १५०० एकरातील कपाशी पीक उपटल्याचे माहिती लोकमतला मिळाली आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादकांकडे केंद्रावर नेण्यासाठी कापूस फार प्रमाणात नाही. शिवाय सीसीआय एवढाच दर खुल्या बाजारात असल्याने अनेक शेतकरी आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना देत आहेत. त्यामुळे सीसीआय आणि पणन महासंघाच्या केंद्रांवर यंदा गर्दी दिसून येत नाही. अनेक शेतकरी कापसाचा भाव वाढेल या आशेवर सध्या कापूस विक्रीच्या मनस्थितीत नाही.

मागील वर्षी ३२.२० लाख क्विंटल कापसाची खरेदी
यंदाच्या वर्षी ६२ हजार ६२४ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस खरेदीसाठी नेांदणी केली आहे. शिवाय शुक्रवारपर्यंत केवळ ५९ हजार ५१५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी सीसीआयने जिल्ह्यात ३२ लाख २० हजार ५९० क्विंटल कापसाची खरेदी केली होती. त्या वर्षी कृषी विभागाचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला होता.

 

Web Title: Waiting for cotton even after opening CCI Marketing Shopping Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस