वर्धा : शेतकऱ्यांनी धारण केलेल्या शेतजमिनीमध्ये एकाहून अधिक सहधारक असतील तर अशा सहधारकांना आपल्या हिश्याच्या वाटणीकरिता अर्ज केल्यास वाटणी पत्राची नोंदणी करण्याची सक्ती राहणार नाही, अशी सुस्पष्ट सुचना शासनाने दिल्या असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम मंत्री रणजीत कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली. यामुळे वर्धा जिल्यातील शेतकऱ्यांनी शेतजमिनीच्या विभागणीसाठी आता केवळ १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुण्यात अर्ज केल्यास सुलभपणे विभाजन होऊ शकेल.महसूल व वनविभागाच्या २६ मे २०१४ च्या पत्रानुसार जिल्हाधिकाऱ्यांना नोंदणीकृत वाटणीपत्राची सक्ती नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होवून सहधारकाला मिळकत प्राप्त होणे ही प्रक्रिया हस्तांतरण या संज्ञेखाली येत नाही. म्हणून वाटणीपत्राची नोंदणी करणे सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे.यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ८५ प्रमाणे तहसीलदारांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.(प्रतिनिधी)
शेतजमिनीच्या विभाजनासाठी नोंदणीकृत वाटपपत्राची आवश्यकता नाही
By admin | Updated: July 5, 2014 01:11 IST