शिक्षक शाळेत येणार; तर विद्यार्थी घरीच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:08+5:30

सर्व शाळांचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शासन आदेशाचे वाचन करून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याबाबतचे शासनाचे आदेश आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे कुठल्याही स्थितीत घाईघाईने निर्णय घेतले जाणार नाही अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

The teacher will come to school; So the student will stay at home | शिक्षक शाळेत येणार; तर विद्यार्थी घरीच राहणार

शिक्षक शाळेत येणार; तर विद्यार्थी घरीच राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देआजपासून विद्यार्थ्यांशिवाय होणार नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : २६ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात होणार आहे. सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीतील निर्णयानुसारच शाळा सुरू करण्याचे सर्वाधिकार शाळांना बहाल केले आहे.
सर्व शाळांचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शासन आदेशाचे वाचन करून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याबाबतचे शासनाचे आदेश आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे कुठल्याही स्थितीत घाईघाईने निर्णय घेतले जाणार नाही अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांना द्यावयाच्या हमीपत्रावरूनही बराच संभ्रम आहे. साधारणत: १ जुलै किंवा त्यादरम्यान प्रत्यक्ष शाळा सुरू होणार असल्या तरी सुरुवातीला वर्ग ९, १० व १२ वी चे वर्ग सुरू होतील. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये तर एक किंवा दोन दिवसाआड तीन तीन तासांची शाळा होईल असे नियोजन आहे. यावेळी शाळांचा सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर यावर भर राहणार आहे. वरच्या वर्गाची शाळा सुरू होत असली तरी सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. कोविडच्या काळात शाळा सुरू होणार असल्याने सर्व शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या उपस्थितीचा थेट संबंध त्यांच्या वेतनाशी जोडल्या जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक संघटनांनी केले आहे.

शाळा सुरू करण्यासाठी अशा राहणार अटी
- शाळा मुख्याध्यापक यांनी शुक्रवार २६ जून रोजी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करणे. -
- बैठकीत शाळा सुरू करण्यापूर्वी आवश्यक बाबींची पूर्वतयारी करणे.
- सदर बैठक अंतर राखून किंवा व्हॉटसअ‍ॅप द्वारे आयोजित करणे.
- बैठकीत चर्चा करून शाळा सुरू करण्यास तयार आहोत असे पत्र गटशिक्षणाधिकारी यांना देणे.
- गटशिक्षणाधिकारी सर्व बाबींची पूर्तता झाली किंवा नाही ते तपासतील व शाळेला प्रमाणपत्र देतील
- शाळा व्यवस्थापन समिती बैठकीत विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था व शाळेच्या शिफ्टबाबत शहानिशा करतील.
- शाळेने हात धुण्यासाठी ग्रामपंचायत किंवा न.प.च्या मदतीने सुविधा उपलब्ध करून देणे. सोबतच शाळेची स्वच्छता व निजंर्तुकीकरण करून देणे.
- शाळा जर विलगीकरण केंद्र असेल तर निजंर्तुकीकरण करून देणे.पालकांना विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
- शाळेत विद्यार्थी व शिक्षक उपस्थित राहत नसतील तर त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून प्राचार्य, डायट यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती करणे.
- शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठी साबण किंवा सॅनिटायझरचा वापर करावा.
- सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य.
- शाळा सुरू करणे व त्यानंतरची दक्षता या बाबी शासन परिपत्रक .१५ जून प्रमाणे कराव्यात.
- टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, न.प. व शाळा व्यवस्थापन समिती यांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा.
- शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना कोणताही कोविड-१९ चा रुग्ण आढळला नाही याची खात्री करावी.

कोविड-१९ चे संक्रमण लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत शासनाने १५ जून रोजी परिपत्रक काढले. त्या परिपत्रकानुसार योग्य अंमलबजावणी करून शाळा सुरू कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी यांनीही दिले आहेत. शाळांनी या सूचनांचे बारकाईने वाचन करून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. संक्रमण होणार नाही याची योग्य खबरदारी घेऊन शाळा मुख्याध्यापक योग्य निर्णय घेतील असा विश्वास आहे. दरम्यान शिक्षकांनी शाळेत रोज उपस्थित राहुन शिक्षण प्रक्रिया थांबणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्यावी.
- जी.एस. बावणकर,
माजी जिल्हा कार्यवाह, विमाशी संघ.

टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्याचे आदेश
वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा २६ जून पासून सुरू होणार का ? याबाबतची चर्चा सर्व स्तरावर सुरू असतानाच शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी, वर्धा यांनी १९ जून रोजी काढले आहेत. या आदेशानुसार काही अटींवर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट होणार आहे. याआधी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबत शासनाने १५ जून रोजी मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक काढून दिल्या आहेत. या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. अर्थातच अटी पूर्ण केल्यानंतरच शाळेची घंटा वाजणार आहे.

Web Title: The teacher will come to school; So the student will stay at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.