पोटाची भूक सूर्यापेक्षाही ‘फायर’; कामगारांचे ‘झुकेगा नही साला’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 05:00 AM2022-05-21T05:00:00+5:302022-05-21T05:00:10+5:30

जिल्ह्यात हातमजुरी करून जगणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इतकेच नव्हे तर रोजगाराच्या शोधार्थ जिल्ह्याबाहेरील अनेक कष्टकरी वर्ध्यात येतात. त्यामुळे काम मिळविण्यासाठी चांगलीच स्पर्धा होते. या स्पर्धेत टिकून राहून आपले व आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी मजूर आणि कामगार आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता डोक्याला दुपट्टा किंवा रुमाल बांधून भर उन्हातच अंगमेहनतीची विविध कामे करतात.

Stomach hunger ‘fire’ even more than the sun; Workers will not bow down! | पोटाची भूक सूर्यापेक्षाही ‘फायर’; कामगारांचे ‘झुकेगा नही साला’!

पोटाची भूक सूर्यापेक्षाही ‘फायर’; कामगारांचे ‘झुकेगा नही साला’!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, यंदाच्या वर्षी ४६.५ अंशापर्यंत तापमानाने उच्चांक गाठल्याचे वास्तव आहे. अशाही परिस्थितीत तप्त उन्हाची तमा न बाळगता कामगार आणि मजूर ‘झुकेगा नही साला’ असेच काहीसे म्हणत केवळ डोक्याला दुपट्टा बांधून पोटाची खळगी भरण्यासाठी राबताना दिसतात.
जिल्ह्यात हातमजुरी करून जगणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इतकेच नव्हे तर रोजगाराच्या शोधार्थ जिल्ह्याबाहेरील अनेक कष्टकरी वर्ध्यात येतात. त्यामुळे काम मिळविण्यासाठी चांगलीच स्पर्धा होते. या स्पर्धेत टिकून राहून आपले व आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी मजूर आणि कामगार आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता डोक्याला दुपट्टा किंवा रुमाल बांधून भर उन्हातच अंगमेहनतीची विविध कामे करतात. त्यांच्या या कामाच्या मोबदल्यात त्यांना पैसे मिळत असले तरी त्यांच्या तप्त उन्हातील श्रमाच्या तुलनेत ते कमीच असल्याची खंतही अनेक मजूर व कामगार व्यक्त करतात.
विशेष म्हणजे शिक्षणाच्या जोरावर अनेक व्यक्ती अधिकारी बनून वातानुकूलीत कक्षात बसून कामे करतात; पण याही अधिकाऱ्यांकडून काही वेळा श्रमाचा मोबदला देताना या कष्टकऱ्यांची बोळवण केली जात असल्याचे सांगण्यात आले. सध्या महागाई चांगलाच उच्चांक गाढत आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका कष्टकऱ्यांना सोसावा लागत आहे. शासनानेही महागाई नियंत्रणासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे.

पारा ४३ अंशांवर 
- नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यात तापमानाने ४६.४ अंश सेल्सिअस इतका उच्चांक गाठला. तर अजूनही जिल्ह्याचे उष्णतामान जास्तच आहे. एकूणच जीवाची काहिली होईल, असे ऊन सध्या जिल्ह्यात असल्याने प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे.

उन्हात काम करताय, ही घ्या काळजी 

उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीने उष्माघाताचा बळी ठरू नये म्हणून डोक्याला दुपट्टा किंवा रुमाल बांधला पाहिजे. 
जमेपर्यंत सावलीत विविध कामे करावी. इतकेच नव्हे तर उन्हात काम करणाऱ्यांनी वेळोवेळी भरपूर पाणी प्यावे, असे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात.

ऊन-सावली आमच्यासाठी एकच
दैनंदिन व्यवहार चालविण्यासाठी तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता दररोज कामावर जावे लागते. माझ्या कुटुंबात  कमावणारे हात दोन आहेत. तर खाणारे हात दहा  असल्याने माझ्यासारख्याच्या हाताला दररोज काम मिळणे गरजेचे आहे.
- श्रावण नेहारे, गवंडी कामगार.

महागाईच्या तुलनेत मोबदला कमी 
हल्ली उन्हाळवाहीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. काडीकचरा वेचणीला सुरुवात झाली आहे; पण महागाईच्या तुलनेत पाहिजे त्या प्रमाणात मजुरी मिळत नाही. आमच्या कुटुंबात एकूण सात सदस्य आहेत. केवळ दोघे कमावते आहो. यामुळे उन्हाचे चटके सहन करून काम करावेच लागते.
- सुनंदा बिरे, मजूर.

उदरनिर्वाहासाठी काम गरजेचे
शेतीचे कामे ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगताच करावे लागते. हल्ली बैलजोडीच्या सहाय्याने वखरवाही करीत आहे. मान्सून लवकर येणार असल्याने आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता शेतीची कामे करीत आहे. माझ्या घरात पाच सदस्य असून, त्यातील मी एकटाच कमावता आहे. यामुळे मी महिनेवारीने शेतमजुरीची कामे करतो.
- चरणदास कुमरे, शेतमजूर.

 

Web Title: Stomach hunger ‘fire’ even more than the sun; Workers will not bow down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.