‘भारत छोडो’ लढ्याचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:49 PM2019-08-08T23:49:10+5:302019-08-08T23:49:37+5:30

दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना या देशातून घालविण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी तयार राहा, असे सांगून ‘भारत छोडो’चा नारा गांधीजींनी देशवासीयांना दिला. याचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम असून या घटनेला ७७ वर्षे झाली आणि याच आठवड्यात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे.

Sevagram Ashram witnesses 'Quit India' fight | ‘भारत छोडो’ लढ्याचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम

‘भारत छोडो’ लढ्याचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम

Next
ठळक मुद्दे७७ वर्षांपूर्वी आंदोलनाची मुहूर्तमेढ स्वातंत्र्यदिनाला होणार ७३ वर्षे

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना या देशातून घालविण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी तयार राहा, असे सांगून ‘भारत छोडो’चा नारा गांधीजींनी देशवासीयांना दिला. याचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम असून या घटनेला ७७ वर्षे झाली आणि याच आठवड्यात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. ‘भारत छोडो’ या घोषणेचे बिजारोपण सेवाग्राम आश्रमात झाल्याने भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात या घटनेला आणि स्मारकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आश्रम विविध संघटना, गांधी विचारक, चळवळीत काम करणाऱ्यांत आणि पर्यटकांसाठी क्रांतीचे स्फुल्लिंग निर्माणाचे काम करीत आहेत.
सेवाग्राम आश्रमची स्थापना ग्रामीण लोकांची सेवा करणे आणि ग्रामोद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आली असली तरी कालांतराने मात्र कार्यकर्त्यांची संख्या वाढली. रचनात्मक कार्य आणि बापूंची प्रयोग भूमी बनली. आश्रमातून देशासाठी कार्यकर्ते घडावे आणि स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करावे, हा सुद्धा या मागे बापूंचा विचार होता. कार्यकर्त्यांच्या गरजा भागविण्यासाठी आश्रमात तसेच जवळच उभारण्यात आलेल्या ग्रामोद्योगाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात असे. बापूंचा आश्रम स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील नेते आणि विदेशातील बापूंना मानणारे येत असे. सभा आणि बैठका होऊन देशाच्या कार्याची, सत्याग्रहाची आणि आंदोलनाची दिशाही ठरविण्यात येत असे.
आश्रमातील पहिली कुटी म्हणजे आताची आदी निवास या नावाने ओळखली जाते. याच कुटीत ‘भारत छोडो’चा मसुदा तयार करण्यात आलेला होता. त्यामुळे या कुटीला ऐतिहासिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. वर्ध्यात १४ जुलै १९४२ मध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होऊन ब्रिटिशांना निर्वाणीचा इशारा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी महात्मा गांधीजी, कस्तुरबा, महादेवभाई देसाई आणि सहकारी रवाना झाले. तत्पूर्वी बा ने बकुळीचे झाड लावले होते. ७ व ८ आॅगस्ट १९४२ रोजी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव मंजूर करण्यात आला आणि ८ ला सायंकाळी गवालिया टँकवरील जाहीर सभेत मौलाना अबुल कलाम आझाद, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि गांधीजींची भाषणे होऊन त्यावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसच्या वतीने ‘चले जाव’ची घोषणा केल्या गेली आणि ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हातात सोपवून ब्रिटिशांना भारत सोडण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. ९ आॅगस्टला देशभरात भारत छोडोचे आंदोलन होणार होते. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पहाटेच गांधीजी, पं. जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि अनेक नेत्यांना अटक करण्यात येऊन पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यात आले. आंदोलनाची सूत्रे कस्तुरबा यांनी हातात घेऊन आंदोलन सहकाºयांसोबत सुरूच ठेवले.
भारतीय इतिहासात ९ आॅगस्ट १९४२ हा दिवस महत्त्वाचा ठरून क्रांतीदिनाची नोंद झाली; पण या क्रांतीदिनाचे बिजारोपण आश्रमात होऊन त्याचा साक्षीदार आदि निवास आहे. नव्या पिढीसमोर हा इतिहास असला तरी प्रेरणादायी मात्र नक्कीच ठरणारा आहे.

Web Title: Sevagram Ashram witnesses 'Quit India' fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.