म्युकरमायकोसिस उपचारांसाठीही सावंगी रूग्णालय सज्ज; 'ई' पंच सूत्रीचे पालन केल्यास आजारावर मात करणे सहज शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 05:10 PM2021-05-18T17:10:02+5:302021-05-18T17:10:44+5:30

विशेषतः रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरलेल्या या आजाराने कोरोना काळातील आरोग्यसेवेपुढेही एक नवे आव्हान उभे केले आहे.

Sawangi Hospital also equipped for treatment of Mucormycosis infarction | म्युकरमायकोसिस उपचारांसाठीही सावंगी रूग्णालय सज्ज; 'ई' पंच सूत्रीचे पालन केल्यास आजारावर मात करणे सहज शक्य

म्युकरमायकोसिस उपचारांसाठीही सावंगी रूग्णालय सज्ज; 'ई' पंच सूत्रीचे पालन केल्यास आजारावर मात करणे सहज शक्य

Next

वर्धा - कोरोना संसर्गाने निर्माण केलेल्या आव्हानांना सामोरे जात असतानाच नव्याने बळावलेल्या म्युकरमायकोसिस या गंभीर आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठीही सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सज्ज आहे. यासाठी, ३० रुग्णखाटांचा विशेष वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. सध्या सावंगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे २४ रुग्ण भरती असून आतापर्यंत १२ शस्त्रक्रियाही यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू तथा ज्येष्ठ मुखशल्यचिकित्सक डॉ. राजीव बोरले यांनी दिली. (Sawangi Hospital also equipped for treatment of Mucormycosis infarction)

म्युकरमायकोसिस हा प्राणघातक बुरशीजन्य आजार ब्लॅक फंगल इन्फेक्शन म्हणूनही पूर्वीपासून वैद्यकीय क्षेत्राला परिचित आहे. मधुमेही, हृदयरुग्ण, कर्करोगग्रस्त, मूत्रपिंडविकार असलेले किंवा एचआयव्हीबाधित रुग्णांना कमीअधिक प्रमाणात बाधक ठरणारा हा दुर्मिळ आजार आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी नव्याने त्रासदायक ठरला आहे. विशेषतः रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरलेल्या या आजाराने कोरोना काळातील आरोग्यसेवेपुढेही एक नवे आव्हान उभे केले आहे.

हा आजार शरीरात विविध मार्गाने प्रवेश करीत असला तरी प्रामुख्याने श्वसनमार्गाने या आजाराच्या विषाणूंचा संसर्ग वाढतो आहे. साधारणतः नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक आणि डोळ्यांना क्षतिग्रस्त करणारा आहे. वरचा जबडा, पॅरानसल सायनस आणि फुफ्फुसांना बाधित करणारा हा आजार श्वसनयंत्रणा, डोळे आणि मेंदूवर परिणाम करणारा आहे. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्यांभोवती व चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यांमधून पाणी गळणे, अंधुक दिसणे, दात दुखणे व हलणे, पू स्त्राव होणे, चेहऱ्याची त्वचा लालसर काळपट होणे, जांभाड्यावर काळे चट्टे येणे, घसा बसणे, श्वास घेताना त्रास होणे, अशी लक्षणे या आजारात प्रामुख्याने दिसतात. क्वचितप्रसंगी छातीत वेदनाही होतात. वेळेवर उपचार न झाल्यास मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी घाबरून न जाता वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण बराही होतो. 

डॉक्टरांच्या सल्ल्याने सीटी स्कॅन, एमआरआय तसेच नाकाची एन्डोस्कोपी किंवा बायोप्सी करून उपचार प्रक्रिया ठरविता येते. कोरोनाबाधित मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे नितांत गरजेचे आहे. मातीचा किंवा धुळीचा संपर्कही रुग्णांनी टाळला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी नव्याने स्वतंत्र वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला असून मॅक्सिलोफेशिअल सर्जन, नाक, कान व घसारोगतज्ज्ञ तसेच नेत्र शल्यचिकित्सक, न्यूरॉलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, एंडोक्रिनोलॉजिस्ट, अशी तज्ज्ञांची फळी येथे कार्यरत आहे. रुग्णांचा आजार नियंत्रित करण्यासाठी उपलब्ध औषधोपचार आणि गरज भासल्यास शस्त्रक्रिया सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आजारावरील औषधोपचार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत केला जात असल्याने रुग्णांनाही दिलासा देणारी बाब आहे, असे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी सांगितले. 

आजार जुनाच, मात्र तीव्रता वाढली
म्युकरमायकोसिस हा जुनाच आजार असून सावंगीच्या शरद पवार दंत रुग्णालयातील आमच्या ओरल अँड मॅक्सिलोफेशिअल सर्जरी विभागात आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया आम्ही केल्या आहेत. भारतात १ लाख लोकसंख्येमागे १४ रुग्ण असे या आजाराचे प्रमाण आहे. गत सहा महिन्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या वर्षभरात म्युकरमायकोसिसचे शंभराहून अधिक रुग्ण सावंगी रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतले आहेत. त्याहीपूर्वी म्हणजे कोरोनासंसर्ग पसरण्यापूर्वी अकोला, अमरावती आणि मध्यभारतातील अन्य गावांतून आलेल्या रुग्णांनी इथे उपचार घेतले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची विविध कारणाने रोगप्रतिकार शक्ती कमी होत असल्याने या आजाराने आज तीव्रतेने डोके वर काढले आहे. त्यामुळे, हा आजार संसर्गजन्य नसला तरी कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनामुक्त झाल्यानंतरही पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे, असे विभाग प्रमुख, ओरल व मॅक्सिलोफेशिअल सर्जरी तथा शल्यचिकित्सक डॉ. नितीन भोला यांनी म्हटले आहे.

'ई' पंचसूत्रीचे पालन केल्यास आजारावर मात -
गेल्या काही आठवड्यापासून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी बुरशीचे संक्रमण म्युकरमायकोसिसच्या रूपाने प्राणसंकट बनले आहे. सायनस म्हणजेच नाक आणि चेहऱ्यामधील पोकळ जागा या संक्रमणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. कोरोनाबाधित रुग्ण, विशेषतः मधुमेह, किडनी व लिव्हरचे व्याधिग्रस्त रुग्ण, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, यांच्यासाठी हा आजार घटक ठरला असून ही निरंतर वाढत जाणारी बुरशी डोळे, नाक, चेहरा, टाळू आणि शेवटी मेंदू यावर आक्रमण करतो आहे. या म्युकरमायकोसिसला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी प्राथमिक लक्षणे दिसताच जनजागरण आणि वैद्यकीय उपचार या दोन्ही स्तरावर सज्ज रहावे लागेल. या रोगनिवारणासाठी एज्युकेशन, अर्ली डिटेक्शन, एंडोस्कोपिक स्क्रीनिंग, इमर्जन्सी सर्जरी आणि इकॉनॉमिक सपोर्ट ही 'ई' पंचसूत्री आज आवश्यक झाली आहे.        
- डॉ. प्रसाद देशमुख, शल्यचिकित्सक
  विभाग प्रमुख, नाक, कान व घसारोग

लक्षणे दिसताच उपचार घेणे महत्त्वाचे     
कोविड १९ आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांवर म्युकरमायकोसिसचे नवे सावट निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांना उपचारादरम्यान रोगनिवारणासाठी विविध औषधी दिली जातात. ज्यांना स्टेरॉईड किंवा टॉसिलीझूमॅब इंजेक्शन देण्यात आली आहेत किंवा तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जे ऑक्सिजन उपचारांवर होते, असे प्रामुख्याने साठ वर्षांवरील रुग्ण या आजाराला सामोरे जात आहेत. या आजारात डोळ्याच्या पापण्यांवर, चेहऱ्यावर येणारी सूज बुबुळांना बाधा पोचविते आणि पुढे मेंदूवरही आघात करते. लागण होताच अवघ्या दोन, तीन दिवसात हा आजार पसरत असल्याने लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय उपचार घेण्याची गरज आहे. यापुढेही म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढू नये यासाठी कोविड १९ च्या रुग्णांना अत्याधिक गरज असेल तरच स्टेरॉईडचा अथवा टॉसिलीझूमॅबचा वापर करणे, मधुमेहावर योग्य नियंत्रण ठेवणे, रुग्णालयातील जीवनदायी उपकरणे आणि सर्वच साधनांचे कटाक्षाने निर्जंतुकीकरण करणे, या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.              
- डॉ. सचिन डायगव्हाणे, शल्यचिकित्सक 
  विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग
 

Web Title: Sawangi Hospital also equipped for treatment of Mucormycosis infarction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.