वर्ध्यातील जनता कर्फ्यूबाबत व्यावसायिकांतच मतभिन्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:00 AM2020-09-21T05:00:00+5:302020-09-21T05:00:34+5:30

शहरात कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्याकरिता मोजक्या व्यापाऱ्यांनी शनिवार ते सोमवारपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला राजकीय रंग मिळाल्याने विरोधक आणि समर्थक आमने-सामने उभे ठाकले. लॉकडाऊनमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्यांना बंदची सक्ती करु नका, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. तर ‘घरीच रहा, सुरक्षित रहा’, असे आवाहन समर्थकांनी केले.

Opinions differ among professionals about public curfew in Wardha | वर्ध्यातील जनता कर्फ्यूबाबत व्यावसायिकांतच मतभिन्नता

वर्ध्यातील जनता कर्फ्यूबाबत व्यावसायिकांतच मतभिन्नता

Next
ठळक मुद्देचार दिवसांचा बंद ठरतोय आभासी : बड्या व्यावसायिकांची साथ, तर छोट्या दुकानदारांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जनता कर्फ्यूच्या मुद्यावरून सुरुवातीपासून विरोध आणि समर्थनाचा धुराळा उडाला. जनता कर्फ्यूचा शुक्रवार हा पहिला दिवस होता. विशेषत: शुक्रवार गुमास्ता दिन असल्याने मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती. मात्र, लघु व्यावसायिकांसह शहरातील इतरांची दुकाने मात्र सुरूच होती. शनिवार आणि रविवारीही या जनता कर्फ्यूला शहरात फारसा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र नव्हते. मुख्य बाजारपेठ बंद असतानाही काहींच्या दुकानांचे शटर उघडेच होते. त्यामुळे जनता कर्फ्यूवरुन व्यापाऱ्यांमध्येच मतभिन्नता असल्यानेच इतरांनी आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवली की काय? अशी शंकाही वर्धेकरांनी व्यक्त केली.
शहरात कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्याकरिता मोजक्या व्यापाऱ्यांनी शनिवार ते सोमवारपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला राजकीय रंग मिळाल्याने विरोधक आणि समर्थक आमने-सामने उभे ठाकले. लॉकडाऊनमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्यांना बंदची सक्ती करु नका, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. तर ‘घरीच रहा, सुरक्षित रहा’, असे आवाहन समर्थकांनी केले. मात्र, शुक्रवारप्रमाणेच रविवारीही मुख्य बाजारपेठेतील कापड लाईन, सराफा लाईन, पत्रावळी चौक, धान्य मार्केट, किराणा लाईन या भागात बंद असतानाही काहिंनी दुकानांचे शटर उघडले होते. तसेच शहरातील इतर परिसरातील दुकाने सुरू होती. फेरीवाल्यांसह, लघु व्यावसायिकांनी रोजीरोटीला महत्त्व देत आपली दुकाने सुरूच ठेवली. शहरात एकंदरीत मोठ्या व्यावसायिकांचा बंद असल्याचेच चित्र दिसून आले.
मात्र, समर्थन करणाºयांनी बंद दुकानांचे तर विरोधकांनी उघड्या दुकानांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला. वर्धेकरांच्या दृष्टीने आभासी ठरलेल्या या जनता कफ्यूमध्ये समर्थक आणि विरोधक यांना फारसे यश आले नसले तरी कोरोनाच वरचढ ठरला, हे निश्चित.

‘त्या’ व्यापाºयांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह
शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव होताच प्रशासनाकडून शहरामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. तेव्हा शहरातील काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या या कडक लॉकडाऊनचा विरोध केला होता. इतकेच नव्हे, तर प्रशासनाविरुद्ध एकजूट करण्यासाठी काहींनी व्यापाऱ्यांची बैठकही बोलावली होती. पण, प्रशासनाने वेळीच संचारबंदीअंतर्गत कारवाई करून त्यांची ही बैठक उधळून लावली होती. सुरुवातीला विरोध करणारे काही व्यापारी आता जनता कर्फ्यूकरिता अट्टहास करीत असल्याने कोरोनाकाळातील त्यांच्या या भूमिकेबद्दल वर्धेकरांच्या मनात शंकेने घर केले आहे.

व्यावसायिकांची उपाययोजनांकडे पाठ
जिल्हा प्रशासनाने अनलॉकनंतर सर्व व्यावसायिकांनीच कोरोना प्रतिबंधित उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे. दुकानामध्ये सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हॅण्डवॉशची व्यवस्था करणे तसेच सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. बाजारपेठेत दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने या सर्व उपाययोजनांकडे व्यावसायिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनता कफ्यूऐवजी व्यावसायिकांनी यावर भर देण्याची गरज आहे. सोबतच प्रशासनानेही यावर लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अ‍ॅन्टिजेनला विरोध अन् जनता कर्फ्यूला समर्थन
काही दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठेतील काही दुकानदार आणि दुकानात काम करणारे कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने कंटेन्मेंट झोन तयार केला होता. तसेच प्रशासनाकडून तेथेच अ‍ॅन्टिजेन टेस्टचीही व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आलेले व्यावसायिक या परिसरात राहत नसल्याने या ठिकाणी कंटेन्मेेंट झोन तयार करणे योग्य नाही. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडतो. प्रशासनाने अ‍ॅन्टिजेन टेस्टची सक्ती करू नये, अशी आगपाखड करीत काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात मोहीम उभारली होती. तसेच काहींनी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काही अंशी व्यापाºयांची मोहीम ‘फत्ते’ ही झाली. पण, आता तेच व्यापारी जनता कर्फ्यूला समर्थन दर्शवित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नो मास्क, नो एन्ट्री
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता प्रशासनाकडूनही लॉकडाऊनचा अधिकार काढून घेण्यात आले आहे. लॉकडाऊन करून लहान व्यावसायिकांसह नागरिकांना वेठीस धरण्याऐवजी स्वत: च काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशीच भूमिका घेण्याची गरज आहे. आपली जबाबदारी ओळखून नियमित मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे ही सवय आता नागरिकांना अंगवळणी पाडावी लागणार आहे. मात्र, यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही.

Web Title: Opinions differ among professionals about public curfew in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.