रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हा! पण, पंखा घरून आणा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 03:03 PM2021-10-18T15:03:27+5:302021-10-18T15:36:15+5:30

समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या छताला लावलेले पंखे नादुरुस्त असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णाला आपल्या सोईसाठी चक्क घरून पंखा आणावा लागला. या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालयातील असुविधांचा कारभार पुन्हा उघड झाला आहे.

no basic facilities for patients in samudrapur govt hospital | रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हा! पण, पंखा घरून आणा...

रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हा! पण, पंखा घरून आणा...

Next
ठळक मुद्देसमुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रकार : रुग्णांचे हाल

वर्धा : ग्रामीण रुग्णालयातील छताला लावले असलेले पंखे बंद असल्याने रुग्णांने आपल्या सोईसाठी घरून पंखा आणून लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

तालुक्याचे स्थळ असलेल्या समुद्रपूर येथे नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून ग्रामीण आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली मात्र,  या ठिकाणी  विविध समस्यांनी कळसच गाठला आहे. या रुग्णालयात सुविधा पुरविण्याची मागणी अद्यापही धुळखात असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. १७ आक्टोबर रोजी रुग्णालयातील पंखे नादुरुस्त असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिला रुग्णाला चक्क घरून पंखा आणून हवा घ्यावी लागली. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

या रुग्णालयात गरोदर माता, शस्त्रक्रियेसाठी येणारे रुग्ण भरती राहतात. ज्या हॉलमध्ये रुग्णांचे बेड आहे त्या हॉलमधील पंखे बंद असल्याने गर्मीने रुग्णांची हेळसांड होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या रुग्णालयात सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागणारे रुग्ण आरोग्य यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने बोट मोडताना दिसतात. प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस हेच या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असल्याची ओरड सध्या होत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनाही चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून समुद्रपूर येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. परंतु, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांची नागपूर येथे बदली झाल्यानंतर समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयाला घरघर लागली आहे. पूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक ग्रामीण रुग्णालयात काही सोई-सुविधांचा तुटवडा तर नाही ना, याचा आढावा वेळोवेळी घेत विविध समस्या वेळीच निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करायचे. परंतु, कार्यरत जिल्हा शल्य चिकित्सकांना तक्रार करूनही ते दुर्लक्षित व हेकेखोर धोरण अवलंबत असल्याने सध्या रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे.

कानउघाडणीनंतर सुरू केला कुलर

रुग्णालयातील सिलिंग फॅन बंद असल्याने रुग्णालयात दाखल तसेच उकाड्यामुळे जीवाची लाहीलाही होणाऱ्या महिला रुग्णाला थेट घरून पंखा आणून पंख्याची हवा घ्यावी लागत आहे. ही बाब एका लोकप्रतिनिधीच्या निदर्शनास येताच त्याने रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्याची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर रुग्णालयातील कुलर रुग्णांसाठी सुरू करण्यात आल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: no basic facilities for patients in samudrapur govt hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.