Lok Sabha Election 2019; Around 62 percent voters have voted in the city | Lok Sabha Election 2019; शहरात सरासरी ६२ टक्के मतदारांनी बजावला हक्क
Lok Sabha Election 2019; शहरात सरासरी ६२ टक्के मतदारांनी बजावला हक्क

ठळक मुद्देखर्डीपुरा केंद्रावर रात्री ७ पर्यंत मतदारांच्या रांगा : नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी केले मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यात सरासरी ६५, तर शहरात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. मतदान करण्याकरिता पुरुषापेक्षा महिला मतदारांची जास्त गर्दी होती. एकूण १२ मतदान केंद्रावर १०९९३ पैकी ६८२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
शहरातील खर्डीपुरा शाळा मतदान केंद्रावर रात्री ७ वाजतासुद्धा मतदारांची मोठी रांग होती. जवळजवळ ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली. या केंद्रावर ७५ टक्के मतदान झाले. मशीनची गती संथ असल्यामुळे मतदानाला वेळ लागत होता. अनेक मतदार कंटाळले, थकले; पण मतदान करूनच बाहेर आले.
शहरातील शिक्षित भागात असलेल्या बूथ क्र. ९५,९६,९७,९८,९९ वर मतदानाचा टक्का कमी झाला असून अशिक्षित भागातील म्हणजेच खर्डीपुरा भागातील ९१,९२,९३ आणि ९४ या बूथ क्रमाकांवर मतदान जास्त झाले. म्हणजेच या वेळेस अशिक्षित व कष्टकरी लोकांचा मतदान करण्याचा उत्साह जास्त, तर शिक्षित लोकांचा उत्साह कमी दिसून आला. शिक्षित भागातील बरेच कर्मचारी निवडणूक ड्युटीवर होते तर काहींनी मूळ गावी मतदान केले.
तालुक्यातील ग्रामीण भागात बऱ्यापैकी मतदान झाले. एकूण सरासरी मतदान ६५ टक्के झाले. तुलनात्मकदृष्ट्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांपेक्षा मतदान काढण्याचा उत्साह जास्त दिसून आला. कारंजा तालुक्यात भाजपाचे ४ जि. प. सदस्य व सहा पंचायत समिती सदस्य असल्यामुळे तसेच पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाचे ताब्यात असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचारात बोलबोला जास्त दिसून आला.
सावल येथील किशोर तुकाराम मानमोरे या नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान करून भारतीय लोकशाहीला महत्त्व दिले. भाजपा आणि कॉँग्रेस उमेदवार यांच्यातच काट्याची लढत झाली. भाजप उमेदवार रामदास तडस व कॉँग्रेस उमेदवार चारूलता टोकस यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. कोण निवडून येणार हे २३ मे ला कळेल; पण तोपर्यंत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जयपराजयाची गणिते मांडण्यात गुंग असल्याचे दिसून आहे.


Web Title: Lok Sabha Election 2019; Around 62 percent voters have voted in the city
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.