खादीला नैसर्गिक रंगांनी आणली रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:46 PM2019-08-31T23:46:55+5:302019-08-31T23:47:20+5:30

ग्रामोद्योगाला चालना देणाऱ्या येथील गांधीवादी मगन संग्रहालय समितीकडून समुद्रपूर तालुक्यातील ठरावीक शंभरावर शेतकऱ्यांकडून २० टक्के अधिक भाव देऊन देशी कापसाची खरेदी केली जाते. कापूस ते कापड अशा खादीच्या प्रवासादरम्यान धाग्यांना नैसर्गिक रंगाई काम होते.

The khadi is brought with natural colors | खादीला नैसर्गिक रंगांनी आणली रंगत

खादीला नैसर्गिक रंगांनी आणली रंगत

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । फळ, फुले, सालीपासून रंगनिर्मिती, तब्बल ६४ शेड्स केले तयार

सुहास घनोकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आधुनिक तंत्रज्ञानात खादी निर्मितीचे आव्हान स्वीकारत वर्ध्याच्या गांधीवादी मगन संग्रहालयाने देशी कापसापासून निर्मित खादीला नैसर्गिक रंगांनी रंगत आणली आहे. बदलत्या काळानुसार खादी कात टाकते आहे. या माध्यमातून समिती स्वदेशी आणि पर्यावरणाची चळवळ मजबूत करीत आहे.
ग्रामोद्योगाला चालना देणाऱ्या येथील गांधीवादी मगन संग्रहालय समितीकडून समुद्रपूर तालुक्यातील ठरावीक शंभरावर शेतकऱ्यांकडून २० टक्के अधिक भाव देऊन देशी कापसाची खरेदी केली जाते. कापूस ते कापड अशा खादीच्या प्रवासादरम्यान धाग्यांना नैसर्गिक रंगाई काम होते. डाळिंब-बाभळीची साल, मंजिष्ठाची मुळे, काथ, नीळ, बिहाडा, हरडा, पळस-झेंडूची फुले आदींपासून ६४ प्रकारचे रंग तयार केले जातात. मदना-मदनी आणि माळेगाव ठेका परिसरातील जंगलातून शेतमजुरांकडून हे साहित्य संकलित केले जाते. साधारणत: जून-जुलैदरम्यान साहित्य संकलनाचे काम केले जाते. मगन संग्रहालय या मजुरांना भरीव मोबदला देते. मजुरांनी संकलित केले साहित्य वाळवणीनंतर यापासून पावडर तयार केली जाते. प्रक्रियेनंतर रंगनिर्मिती होते. कुठल्याही रसायनाविना संग्रहालयाने पर्यावरणपूरक तब्बल ६४ शेड्स तयार केले आहेत. मगन संग्रहालयातच सेंद्रिय कापसावर जिनिंग प्रक्रिया, पेळू तयार करणे, सौर ऊर्जेवरील अंबर चरख्यांच्या माध्यमातून धागा तयार करणे, प्राकृतिक रंगाई, धाग्यांचे कोन (रीळ) तयार करणे आणि निटिंग युनिटमध्ये कापड तयार करणे असा कापूस ते खादीचा प्रवास आहे. नैसर्गिक रंगांमुळे खादीला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. खादीवर विविध प्रयोग करीत बदलत्या पोषाखाला तोड देण्याचा प्रयत्न केला जात आहे. संग्रहालयातील खादीला विदर्भासह बंगलोर, कर्नाटक, चेन्नई येथून प्रचंड मागणी होत आहे.

डिझाईनसाठी विविध पानांचा वापर
खादी कापडावर प्रिंटिंगकरिता विविध प्रकारच्या वृक्षांच्या पानांचा वापर केला जातो. संग्रहातील कलाकार ब्लॉक प्रिंटिंग, हॅण्ड प्रिटिंग, इको प्रिटिंग, लाईन प्रिटिंग, लिफ प्रिटिंगद्वारे डिझाईनिंगचे काम करतात. वैविध्यपूर्ण या डिझाईन्स खादीप्रेमींच्या पसंतीस उतरत आहेत.

Web Title: The khadi is brought with natural colors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Khadiखादी