वर्धा गर्भपात प्रकरण : पीडितेच्या आईच्या धाडसामुळेच अवैध गर्भपाताचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 10:48 AM2022-01-18T10:48:18+5:302022-01-18T11:04:20+5:30

आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय मिळण्याची मागणी पीडितेच्या आईने पोलिसांकडे केलेली आहे.

Illegal abortion exposed due to the courage of the victim's mother | वर्धा गर्भपात प्रकरण : पीडितेच्या आईच्या धाडसामुळेच अवैध गर्भपाताचा पर्दाफाश

वर्धा गर्भपात प्रकरण : पीडितेच्या आईच्या धाडसामुळेच अवैध गर्भपाताचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्देकठोर कारवाई करण्याची मागणी

राजेश सोळंकी

वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. या प्रकरणात धाडस करून तक्रार करणाऱ्या त्या मातेला सलाम करावा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिने संपूर्ण प्रकरण उघडकीस आणून पोलिसांना साद दिल्याने जलदगतीने तपास होऊन अवैध गर्भपाताचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे; अन्यथा आणखी किती कोवळे जीव बळी पडले असते कोणास ठाऊक.

आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय मिळण्याची मागणी पीडितेच्या आईने पोलिसांकडे केलेली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा अनेक घटना कधी उजेडातच येत नाहीत. मुलीचे कसे होणार, समाज काय म्हणेल, आपली बदनामी होईल, या भीतीने अनेक गुन्हे दडविले जातात आणि अशा हॉस्पिटल चालकांना पुन्हा अनैतिक पदाची जणू पावतीच मिळते. अशा बाबतीत समोर यायला कोणीही धजावत नाही. मात्र, हातमजुरी करणाऱ्या या गरीब मातेने हिंमत करून पोलीस ठाण्यात तक्रार करीत या प्रकरणाला वाचा फोडली आणि चार दशकांपासून सुरू असलेल्या या अवैध गर्भपाताच्या पापाचा घडा फुटला.

असे उलगडले रहस्य...

१७ वर्षीय मुलाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. पीडितेचे पोट दुखत असल्याने तिच्या आई-वडिलांनी खासगी रुग्णालयात तपासणी केली असता, ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. आई-वडिलांनी पीडितेला विश्वासात घेत विचारपूस केली असता, सर्व प्रकार तिने कथन केला. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी मुलाच्या आई-वडिलांची भेट घेतली आणि झालेला प्रकार सांगून मुलाविरुद्ध तक्रार देण्यास जात असल्याचे सांगितले.

मात्र, मुलाच्या आई-वडिलांनी त्यांना रस्त्यातच अडवून प्रकरण रफादफा करण्यास सांगितले. नाहीतर मुलीची बदनामी करू, अशी धमकी दिली. मुलीचे आईवडील घाबरले. ३ जानेवारी रोजी त्यांनी मुलीला आर्वीतील कदम हॉस्पिटलमध्ये नेले. ३० हजार रुपये देऊन ५ जानेवारी रोजी मुलीचा गर्भपात केला. दोन दिवसांनी तिच्या पोटात पुन्हा दुखू लागल्याने तिला तपासणीसाठी नेऊन औषधोपचार सुरू झाले. मात्र अखेर मुलीच्या आई आणि मावशीने ९ जानेवारीला पोलिसांत तक्रार दिली. ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि वरिष्ठांना माहिती दिली. जलदगतीने तपासचक्र फिरवून डॉ. रेखा कदम यांना अटक केली.

चौकशीदरम्यान या सर्व बाबींचा उलगडा झाला. एकेक रहस्य बाहेर यायला लागले. खोदकामात १२ कवट्या अन् ५४ हाडांसह एक गर्भपिशवी, रक्त लागलेले कपडे आणि अनेक संशयित साहित्य बायोगॅसच्या चेंबरमधून जप्त केले. तसेच मुदतबाह्य औषधे, वन्यप्राण्यांची कातडीही पोलिसांनी जप्त केली. पाच आरोपी कारागृहात असून, डॉ. नीरज कदम हा सध्या पोलीस कोठडीत आहे.

Web Title: Illegal abortion exposed due to the courage of the victim's mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.