धान्य वाटपात हिंगणघाट उपविभाग अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 09:53 PM2019-08-21T21:53:32+5:302019-08-21T21:55:23+5:30

गावातील गरजूंना स्वस्त दरात आवश्यक ते धान्य पुरवठा करण्यासाठी गावोगावी स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती करण्यात आली आहे. पण, या दुकानातून धान्य वाटपामध्ये गैरप्रकार वाढल्याने काहींना लाभापासून वंचित राहावे लागत होते. हा गैरप्रकार टाळण्यासाठी शासनाने पॉस मशीनची व्यवस्था सुरु केली.

Hinganghat subdivision tops the grain allocation | धान्य वाटपात हिंगणघाट उपविभाग अव्वल

धान्य वाटपात हिंगणघाट उपविभाग अव्वल

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात मारली बाजी : पॉस मशीनमुळे यंत्रणा झाली पारदर्शक

भास्कर कलोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : गावातील गरजूंना स्वस्त दरात आवश्यक ते धान्य पुरवठा करण्यासाठी गावोगावी स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती करण्यात आली आहे. पण, या दुकानातून धान्य वाटपामध्ये गैरप्रकार वाढल्याने काहींना लाभापासून वंचित राहावे लागत होते. हा गैरप्रकार टाळण्यासाठी शासनाने पॉस मशीनची व्यवस्था सुरु केली. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने गरजूंपर्यंत धान्य पुरवठा करण्यात यश मिळविले असून हिंगणघाट उपविभाग जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट उपविभागात हिंगणघाट व समुद्रपूर या दोन तालुक्याचा समावेश आहे. या उपविभागात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत २५० स्वस्त धान्य दुकान कार्यरत असून या सर्वच दुकानात पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात येते. यामध्ये हिंगणघाट तालुक्यात १३३ स्वस्त धान्य दुकानातून ६ हजार ६५६ अंत्योदय शिधा पत्रिकाधारक, १ लाख ४० हजार २६० प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी (व्यक्तीनुसार वाटप) व २० हजार ९९० शेतकरी लाभार्थी (व्यक्तीनुसार वाटप) यांना धान्य वितरण करण्यात येते.
तसेच समुद्रपूर तालुक्यात ४ हजार ९८७ अंत्योदय शिधा पत्रिकाधारक, ८१ हजार ३८० प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी (व्यक्तीनुसार वाटप ) व १७ हजार ९८२ शेतकरी लाभार्थी ( व्यक्तीनुसार वाटप ) आहे. या सर्व लाभार्थ्यांना दरमहा धान्य पुरवठा केल्या जात आहे.
धान्य वितरण व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यासाठी हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार श्रीराम मुंदडा, अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी सुहास टोंग, हिंगणघाटचे पुरवठा निरीक्षक विशाल गवई तर समद्रपूरचे तहसीलदार राजू रणविर व समुद्र्रपूरचे पुरवठा निरीक्षक अजय साबळे यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी परिश्रम घेत आहे.
समुद्रपूर तालुक्याची वितरणामध्ये आघाडी
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याकरिता फेब्रुवारी २०१७ पासूनच पॉस मशीन स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार फेब्रुवारी २०१७ पासून हिंगणघाट उपविभागाने आॅनलाईन धान्य वितरणात आघाडी घेतलेली होती. ती आघाडी आजपर्यंत कायम ठेवलेली आहे. जुलै २०१९ मध्ये समुद्रपूर तालुक्याने ९५.११ टक्के धान्य वितरण करुन प्रथम क्रमांक पटकाविला तर हिंगणघाट तालुक्याने ९४.२१ टक्के धान्य वितरण करुन दुसरा क्रमांक मिळविला आहे. धान्याच्या वितरणात पारदर्शकता आणून सर्वांना लाभ दिला जात आहे.

स्वस्त धान्य हे गरजूंपर्यंत पोहोचविणे खरेतर प्रशासनाची जबाबदारी आहे. पॉस मशिनद्वारे धान्य वितरणातील चोरीला आळा बसला असून प्रत्येक गरजूला दरमहा धान्य दिल्या जात आहे. हिंगणघाट उपविभागील समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील अडीचशे स्वस्त धान्य दुकानांमार्फत पारदर्शकपणे धान्य वितरण केले जात आहे. सर्व अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळत असल्याने जिल्ह्यात हिंगणघाट उपविभाग प्रथम ठरला आहे.
चंद्रभान खंडाईत, उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट

Web Title: Hinganghat subdivision tops the grain allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.