केंद्र सरकारची भूमिका संविधानाविरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:25+5:30

जगातील विद्यापीठात गांधीजींवर अभ्यास केला जात आहे. पुतळे उभारण्यात आलेले आहे. बराक ओबामा म्हणतात ‘मी गांधीजीमुळे अमेरिकेचा अध्यक्ष बनलो’ तर नेल्सन मंडेला गांधीजींचे नाव घेतात पण; त्याच गांधीजींना त्यांच्याच देशात तिरस्कार मिळत आहे. नरेंद्र मोदी ज्या शाळेत शिकले त्याचा आता द्वेष करण्यात येत आहे. मजबुरी का नाम महात्मा गांधीजी म्हणत ते चुकीच्या पध्दतीने लोकांसमोर ठेवण्यात आले. गांधीजी कधीही मरु शकत नाही.

The central government's role is against the constitution | केंद्र सरकारची भूमिका संविधानाविरोधात

केंद्र सरकारची भूमिका संविधानाविरोधात

Next
ठळक मुद्देमहादेव विद्रोही : सर्व सेवा संघ व सर्वोदय समाजाच्यावतीने सेवाग्राम येथे उपवास सत्याग्रह

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सर्व धर्म समभाव आपल्या जीवनातून सांगितला होता. त्याच देशातील नागरिकांना आता येथील नागरिक असल्याचे सिद्ध करावे लागत आहे. असा प्रसंग बापूंसोबत दक्षिण आॅफ्रिकेत घडला होता. तेथील कायद्याच्या विरोधात बापूंनी सत्याग्रह केला होता. त्यात त्यांना यशही मिळाले होते. आज तिच वेळ भारतीयांवर आलेली आहे. नागरिक असल्याचे सिद्ध करा; अन्यथा डिटेंशनमध्ये जावे लागेल, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. सरकारची ही भूमिका नागरिकांच्या व संविधानाविरोधात आहे, असा आरोप सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी केला. तसेच नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सर्व सेवा संघाने न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही सांगितले.
महात्मा गांधीजींच्या ७२ व्या पुण्यतिथी निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा अपमान, नागरिकता संशोधन कानून, एन.आर.सी. तसेच एन.पी.आर.च्या विरोधात सेवाग्राम येथे सर्व सेवा संघ व सर्वोदय समाजाच्यावतीने उपवास सत्याग्रह आणि जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना महादेव विद्रोही बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे, अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश खैरनार, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू, गांधी सेवा संघाचे अध्यक्ष कनकमल गांधी, इक्राम हुसैन, राजेंद्र शर्मा, डॉ. शिवचरण ठाकूर, मुकुंद मस्के, अशोक शरण आदींची उपस्थिती होती. सकाळी ९ वाजता या उपवास सत्याग्रहाला सुरुवात झाली असून प्रारंभी भजने व गीत सादर करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे म्हणाले, जगातील विद्यापीठात गांधीजींवर अभ्यास केला जात आहे. पुतळे उभारण्यात आलेले आहे. बराक ओबामा म्हणतात ‘मी गांधीजीमुळे अमेरिकेचा अध्यक्ष बनलो’ तर नेल्सन मंडेला गांधीजींचे नाव घेतात पण; त्याच गांधीजींना त्यांच्याच देशात तिरस्कार मिळत आहे. नरेंद्र मोदी ज्या शाळेत शिकले त्याचा आता द्वेष करण्यात येत आहे. मजबुरी का नाम महात्मा गांधीजी म्हणत ते चुकीच्या पध्दतीने लोकांसमोर ठेवण्यात आले. गांधीजी कधीही मरु शकत नाही. साध्वीने गोळ्या मारल्या तरीही गांधी मेले नाही. जगाला प्रेम, सत्य, अहिंसा पाहिजे यासाठी गांधीजी पाहिजे आहे, असेही चंद्रकांत वानखेडे म्हणाले. सुरेश खैरनार म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना धन्यवाद दिले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आज सर्व लोक प्रथमच घराबाहेर पडून सत्याग्रह करीत आहेत. यातून जागृतीचे काम घडत आहे. सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी लोकांचे लक्ष वळविण्याकरिता हा उद्योग सुरु केला आहे. सरकारी सर्व उद्योगाचे खाजगीकरण करण्याचा घाट सरकारने घातला आहे. देशात अनेक समस्या आहेत, त्याकडे लक्ष नाही. निवडणूकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यात सरकारला अपयश आले आहे. यांची वृत्ती ही हिटलरशाहीची असून तेच खऱ्या अर्थाने देशद्रोही आहेत, अशी घाणाघाती टिका खैरनार यांनी केली. गांधीजींच्या पुण्यतिथीला या कायद्याच्या विरोधात उपवास करण्यात आला असून हा गांधींचा सत्याग्रह आहे. आता सर्वांनी घराबाहेर पडावे. यातूनच आशेचा किरण निर्माण होईल, असे आवाहन उपस्थितांनी मार्गदर्शनातून केले. सर्वधर्म प्रार्थनेने या कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन अविनाश काकडे यांनी केले.

तिरंगा हातात घेऊनच लढाई लढावी लागेल - फिरदोस मिर्झा
गांधीजींनी सत्याग्रह करून नोंदणी कायदा मागे घेण्यास भाग पाडले होते. आज तेच आपल्या देशात घडत आहे. संविधानाने येथील नागरिकांना सर्व हक्क व अधिकार दिले आहे पण; नव्या सरकारच्या कायद्याने मात्र नेमके कोण, कुठले नागरिक हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका गरीब लोकांना बसणार आहे, मग तो कोणत्याही जाती, धर्माच असू द्या. सरकारने स्वत:चे अपयश लपविण्याकरिता नोटबंदी, जीएसटी आणि आता नागरिकता संशोधन कायदा अंमलात आणला आहे. यातून नागरिकांना केवळ अडकवून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. लोकं कागदपत्रांच्या मागे लागतील पण; ही गोष्ट एवढी सोपी नाही. आसामचा विचार केला तर सरकारी यंत्रणा आणि कागदपत्रे गोळा करण्याचा खर्च किती होईल, याचा हिशोब अवाक्याच्या बाहेर आहे. लोकांना पुराव्यानिशी नागरिकत्व सिध्द करावे लागेल. आजही केवळ ५८ टक्के लोकांच्या जन्माची नोंद आहे. मग उरलेल्यांचे काय? असा प्रश्न अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी उपस्थित केला आहे. प्लास्टिकचे उदाहरण घेतल्यास बंदीचा फटक प्लास्टिक वेचणाऱ्यांना बसला. त्यांच्या हाताचे काम हिरावल्या गेले.सरकारी उद्योग विकल्या जात आहे. आर्थिकदृष्ट्या देश कमकुवत होत आहे. त्यामुळे आता मुसलमानांचाच प्रश्न नाही तर तिरंगा हातात घेऊन सर्वांनाच लढाई लढावी लागणार आहे, असेही अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी सांगितले.

Web Title: The central government's role is against the constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.