स्वतंत्र विदर्भ राज्याकडे दुर्लक्ष भाजपला भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:04 PM2019-10-31T12:04:40+5:302019-10-31T12:06:07+5:30

भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे प्रचारातही कायम दुर्लक्ष केल्याने नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका मतदारांनी दिला आहे.

BJP ignores independent Vidarbha state | स्वतंत्र विदर्भ राज्याकडे दुर्लक्ष भाजपला भोवले

स्वतंत्र विदर्भ राज्याकडे दुर्लक्ष भाजपला भोवले

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक विदर्भवादी स्वतंत्र निवडणूक लढूनही पराभूत नागविदर्भ आंदोलन समितीचे राजेही हरले

अभिनय खोपडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला भारतीय जनता पक्षाने सोडचिठ्ठी दिल्याने या निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे दिसून येत आहे. २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विदर्भात सर्वाधिक जागा जिंकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद पटकाविले होते. १९९० च्या दशकात भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भ राज्याचा उल्लेख केला होता. भाजप देशात लहान राज्याचे समर्थन करणारा पक्ष असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य होेईल अशी जनतेला आशा होती परंतु शिवसेनेच्या दबावामुळे भाजपला स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा गुंडाळून ठेवावा लागला. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर विदर्भवाद्यांनी भाजप नेत्यांच्या घरावर मोर्चे नेलेत निदर्शने केली. त्यावेळी विदर्भ राज्य देऊ असे लेखी आश्वासन भाजप नेत्यांनी दिली होते. परंतु सत्तेवर येताच भाजपने विदर्भ राज्यात मागणीकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर विदर्भात अनेक नवीन जिल्ह्याचे प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे हे जिल्हे निर्माण केले जातील असेही सांगण्यात आलं होतं परंतु वित्त विभागाने निर्मितीबाबत आडकाठी आणली. त्यामुळे विदर्भात एकही नवा जिल्हा निर्माण झाला नाही. यावेळी भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे प्रचारातही कायम दुर्लक्ष केल्याने नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका मतदारांनी दिला आहे. अहेरीचे राजे व विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते अम्ब्रीशराव आत्राम हे भाजपच्या तिकीटावर पराभूत झाले.

विदर्भवादीही निवडणुकीत पराभूत
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा पुरस्कार करणारे विविध उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. राजुरा मतदारसंघातून माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, हिंगणघाट मतदारसंघातू अनिल जवादे यांनाही या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. विदर्भवादी नेते अशी ओळख असलेले धर्मरावबाबा आत्राम अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत त्यांनी विदर्भवादी नेते व भाजपचे उमेदवार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा पराभव केला. त्यांची नागविदर्भ आंदोलन समिती विदर्भ राज्याच्या मागणीची कट्टर समर्थक आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत विदर्भ राज्य व अहेरी जिल्हा झाला नाही.

विदर्भाच्या विकासावर फक्त गडकरीच बोलले
भाजपचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी विदर्भातील विकासाच्या विविध मुद्द्यांना प्रचारादरम्यान हात घातला व विदर्भाचा विकास अधिक गतीने केला जाईल असे आश्वासन त्यांनी विविध जाहीर सभांमधून मतदारांना दिले त्याचा परिणाम भाजपच्या विदर्भातील काही जागा टिकवून ठेवण्यात झाला हे दिसून येत आहे.

बावनकुळे फॅक्टरचा परिणाम
भाजपने यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कापली याचा मोठा फटका पक्षाला बसला. गेल्या दोन निवडणुका भाजपकडे असलेला तेली समाज काँग्रेसकडे वळता झाला. यांचा विदर्भातील निकालांवर परिणाम झाला.
भाजपने यापूर्वी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण केले नाही. याचा निश्चितच काही प्रमाणात फटका भाजपला बसला. शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत देण्यात आली नाही. त्यामुळेही भाजप पराभूत झाली. स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कार करणारे अहेरीचे राजेही या निवडणुकीत हरलेत. आम्ही पूर्वीपासून विदर्भ राज्याचा पुरस्कार करीत होतो आताही विदर्भ राज्याची मागणी सरकार दरबारी लावून धरणार आहोत.
- धर्मरावबाबा आत्राम, आमदार तथा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश.

Web Title: BJP ignores independent Vidarbha state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.