आर्वी गर्भपात प्रकरण! ‘कदम’ रुग्णालयात १० दिवसात झाल्या ७० सोनोग्राफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 07:00 AM2022-01-22T07:00:00+5:302022-01-22T07:00:02+5:30

Wardha News डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम चालवित असलेल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये १ जानेवारी ते १० जानेवारीदरम्यान तब्बल ७० सोनोग्राफी करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

Arvi abortion case! 70 sonographs performed in 10 days at Kadam Hospital | आर्वी गर्भपात प्रकरण! ‘कदम’ रुग्णालयात १० दिवसात झाल्या ७० सोनोग्राफी

आर्वी गर्भपात प्रकरण! ‘कदम’ रुग्णालयात १० दिवसात झाल्या ७० सोनोग्राफी

Next
ठळक मुद्देअनेक फॉर्मवरील स्वाक्षऱ्याच गहाळ

चैतन्य जोशी

वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणात आता नवनवे खुलासे समोर येत असतानाच डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम चालवित असलेल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये १ जानेवारी ते १० जानेवारीदरम्यान तब्बल ७० सोनोग्राफी करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती असून यापैकी अंदाजे ४४ सोनोग्राफींच्या फॉर्मवर पेशंटच्या स्वाक्षऱ्या दिसून आल्या नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

आर्वी येथील गर्भपात प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच आरोग्य विभागाला या अतिसंवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य अजूनही समजले नसल्याचे दिसून येत आहे. पीसीपीएनडीटी कमिटीने ४८ तासात चौकशी अहवाल न्यायालयात सादर करणे आवश्यक असतानाही तब्बल ११ दिवसांनी अहवाल सादर करण्यात आला. डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये १ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान तब्बल ७० सोनोग्राफी झाल्या मात्र, यातील अनेक सोनोग्राफी फॉर्मवर पेशंटची आणि डॉक्टरांची स्वाक्षरी आढळून आलेली नाही. तसेच सोनोग्राफीचे कारणही नमूद केलेले नसल्याचे आढळून आले. एफ फॉर्ममध्येही अनेक त्रुट्या आढळून आल्या. मात्र, अजूनही आरोग्य विभागाकडून पाहिजे तशी कारवाई केल्या जात नसल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.

सीएस आणि वैद्यकीय अधीक्षकांच्या वक्तव्यात विरोधाभास

आर्वी येथील गर्भपात घटनेनंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी शासकीय गोळ्यांचा अपहार झाल्याचे घटनेच्या दोन दिवसांनंतर सांगितले होते. तशी तक्रारही त्यांनी दिली होती. मात्र, नुकतेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तडस हे आर्वीला गेले असता त्यांनी शासकीय गोळ्यांचे लेबल मिळते जुळते नसल्याचे सांगितल्याने हा विरोधाभास ‘कदम’ यांना वाचविण्यासाठी तर नाही ना, असा संशय निर्माण झाला आहे.

गर्भपात केंद्रांसह सोनोग्राफी सेंटरची तपासणी नाहीच

जिल्ह्यात ३४ खासगी तर ११ शासकीय गर्भपात केंद्र असून सुमारे ४० वर सोनोग्राफी सेंटर असल्याची माहिती आहे. कदम रुग्णालयात हा प्रकार उघडकीस येताच जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर आणि गर्भपात केंद्राची भरारी पथकांद्वारे तपासणी करण्याची नितांत गरज होती. जर कदम रुग्णालयात हा प्रकार सुरू होता तर अशा अनेक केंद्रांवर असा प्रकार सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आरोग्य विभागाने तपासणी करण्याचे साधे पावलेही उचललेली नाहीत.

रेडिओलॉजिस्ट देण्यास विलंब कशासाठी?

आर्वी येथील घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सोनोग्राफी मशिन सील करून जप्त केली होती. या मशिनची तपासणी करण्यासाठी पाच दिवसांपूर्वी आर्वी पोलिसांनी आरोग्य विभागाकडे रेडिओलॉजिस्ट देण्याबाबतचे पत्र पाठविले होते. मात्र, अजूनही आरोग्य विभागाने रेडिओलॉजिस्ट उपलब्ध करुन न दिल्याने आरोग्य विभाग करतोय तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परिचारिकांचा जामीन फेटाळला

डॉ. रेखा कदम हिला सहकार्य करणाऱ्या परिचारिका संगीता गळे आणि पूजा दहाट यांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्या न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांनी विशेष जिल्हा व सत्र पॉक्सो न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने दोन्ही परिचारिकांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

शासकीय औषध माझ्याकडून गेले नाही

आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे औषध निर्माण अधिकारी देवेंद्र शिर्शीकर यांनी सांगितले की, जो शासकीय औषधसाठा येतो तो त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून मिळतो. आलेल्या औषधांची नोंद पुस्तकात घेऊन त्याची आंतररुग्ण विभाग शल्यक्रिया विभागाच्या मागणीनुसार औषधी वितरीत करतो. कदम रुग्णालयात मिळालेले शासकीय औषधी ही माझ्याकडून गेलेली नाही. ती औषधी आली कुठून हे मी नक्की सांगू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Arvi abortion case! 70 sonographs performed in 10 days at Kadam Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.