कदम हॉस्पिटलमध्ये सापडली काळवीटाची कातडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 05:00 AM2022-01-16T05:00:00+5:302022-01-16T05:00:21+5:30

शासकीय रुग्णालयातील टास्क फोर्स आर्वी येथे कदम रुग्णालयात तपासणीसाठी शनिवारी सकाळी दाखल झाला. या पथकाकडून रात्री ९ वाजेपर्यंत विविध कागदपत्रे तपासण्यात आली. असे असले तरी चौकशी सुरू असतानाच दुपारी चौकशी करणाऱ्यांच्या हाती काळवीटची कातडी लागल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.  कदम यांच्या घराची झडती घेण्यात आली असता वरच्या माळ्यावर काही रजिस्टर व वन्य प्राण्यांची कातडी आढळली.

Antelope skin found in Kadam Hospital | कदम हॉस्पिटलमध्ये सापडली काळवीटाची कातडी

कदम हॉस्पिटलमध्ये सापडली काळवीटाची कातडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा (आर्वी) : संबंध राज्यात गाजत असलेल्या आर्वी येथील डॉक्टर कदम यांच्या रुग्णालयातील गर्भपात प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. शासकीय रुग्णालयातील टास्क फोर्स आर्वी येथे कदम रुग्णालयात तपासणीसाठी शनिवारी सकाळी दाखल झाला. या पथकाकडून रात्री ९ वाजेपर्यंत विविध कागदपत्रे तपासण्यात आली. असे असले तरी चौकशी सुरू असतानाच दुपारी चौकशी करणाऱ्यांच्या हाती काळवीटची कातडी लागल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.  कदम यांच्या घराची झडती घेण्यात आली असता वरच्या माळ्यावर काही रजिस्टर व वन्य प्राण्यांची कातडी आढळली. आर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांनी वन्यजीवाची कातडी जप्त करीत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. वनविभाग व पोलिसांनी कदम यांच्या हॉस्पिटल, इमारतीची झडती घेतली. त्यात दहा फाईल व इतर कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील टास्क फोर्सचे पथक प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता भिसे यांच्या नेतृत्वात दाखल झाले. या पथकात स्त्री व प्रसूती विभाग प्रमुख डॉ. मनीषा नासरे, आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे, फॉरेन्सिक तज्ज्ञ यांचा समावेश होता. याशिवाय दोन परिचारिका यांच्या पथकाने वेगवेगळ्या पातळीवर रुग्णालयातील बाबींची तपासणी केली. वनविभागाने काळवीटाचे कातडे जप्त करून संशयीत आरोपी म्हणून डॉ. कदम यांच्यावर वनगुन्हा दाखल केल्याचे जाधव यांनी सांगितले. काळवीटचे  कातडे सापडल्यामुळे कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून आता वनविभागाने याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९.३९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उपवनसंरक्षक शेपट, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) बोबडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी एन.एस. जाधव व त्यांचे सहकारी तपास करीत आहे.

रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती रेकाॅर्ड तपासणी
-   वर्धा : शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातून रवाना झालेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आर्वी येथील कदम हॉस्पिटल गाठून कदम हॉस्पिटलचा रेकॉर्ड तपासणीच्या कामाला सुरुवात केली. दरम्यान प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता भिसे यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह आर्वीचे कदम हॉस्पिटल गाठून आपल्या डोळ्यादेखतच रेकॉर्ड तपासणीचे काम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना करीत रात्री ७ वाजेपर्यंत आर्वीच्या कदम हॉस्पिटलमध्ये ठाण मांडले होते. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता भिसे व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसूती विभागप्रमुख डॉ. मनीषा नासरे यांच्या नेतृत्वातील आरोग्य विभागाच्या चमूने शनिवारी रात्री ७ वाजेपर्यंत अवैध गर्भपात करणाऱ्या आर्वीच्या कदम हॉस्पिटलमधील दाखल व सुटी झालेल्या रुग्णांचा रेकॉर्ड तसेच या हॉस्पिटलमधून किती प्रसूती, गर्भपात तसेच किती महिला आणि पुरुषांची सोनोग्राफी झाली आहे, याची अधिकची माहिती जाणून घेतल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

अधिकाऱ्यांकडून पाळली गेली कमालीची गुप्तता
-    आरोग्य विभागाच्या चमूद्वारे कदम हॉस्पिटलचा रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू असताना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून कमालीची गुप्तताच ठेवण्यात आली. विशेष म्हणजे रेकॉर्ड तपासणीदरम्यान कुठलीही माहिती बाहेर जाऊ नये याची विशेष दक्षता घेण्यात आल्याने नेमका कुठल्या रेकॉर्डमध्ये त्रुटी आढळल्या, हे कळू शकले नाही.
-    अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपीचा पती आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असून या रुग्णालयाला मागील ३३ महिन्यात ‘मिजोप्रॉस्ट’च्या १,२२० टेबलेटचा पुरवठा झाला आहे. 

कदम हॉस्पिटलमधील रेकॉर्ड तपासणीचे काम सुरू आहे. अजूनही रेकॉर्ड तपासला जात असल्याने आताच याप्रकरणी काही बोलणे योग्य होणार नाही.
- डॉ. संगीता भिसे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.

 

Web Title: Antelope skin found in Kadam Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.