आजनसरा बॅरेज प्रकल्प 208 कोटींवरून पोहोचला 860 कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:00 AM2021-03-04T05:00:00+5:302021-03-04T10:30:12+5:30

शासनाने १३ एप्रिल २००० मध्ये या प्रकल्पाकरिता १५८ कोटी २१ लाखांची मूळ प्रशासकीय मान्यता दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २००१ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. परंतु पाच वर्षांपर्यंत निधीअभावी कामाला सुरुवात झाली नसल्याने नव्याने प्रशासकीय मान्यता घेण्याची नामुष्की ओढवली होती. २००६ मध्ये २०८ कोटी ४२ लाख २७ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

The Ajansara barrage project has gone from Rs 208 crore to Rs 860 crore | आजनसरा बॅरेज प्रकल्प 208 कोटींवरून पोहोचला 860 कोटींवर

आजनसरा बॅरेज प्रकल्प 208 कोटींवरून पोहोचला 860 कोटींवर

googlenewsNext
ठळक मुद्देना कामाला सुरुवात ना सिंचनाचा लाभ : वीस वर्षांपासून केवळ मिळतात आश्वासनेच

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील बरेच प्रकल्प अनेक वर्षे खितपत पडल्याशिवाय पूर्णत्वास गेलेले नाहीत, ही आजपर्यंतची स्थिती राहिली आहे. यामध्ये हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे वर्धा नदीवर बॅरेज उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. वीस वर्षांपूर्वी या प्रकल्पाकरिता २०८ कोटी ४२ लाख २७ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. पण, अद्यापही या प्रकल्पाची एक वीटही रचली गेली नाही. परिणामी या प्रकल्पाची किंमत  ८६० कोटींवर पोहोचली असून हा प्रकल्प होणार नाहीच, अशीच समजूत परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे.
हिंगणघाट तालुक्यातील कोरडवाहू जमीन ओलिताखाली यावी म्हणून शासनाने १३ एप्रिल २००० मध्ये या प्रकल्पाकरिता १५८ कोटी २१ लाखांची मूळ प्रशासकीय मान्यता दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २००१ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. परंतु पाच वर्षांपर्यंत निधीअभावी कामाला सुरुवात झाली नसल्याने नव्याने प्रशासकीय मान्यता घेण्याची नामुष्की ओढवली होती. २००६ मध्ये २०८ कोटी ४२ लाख २७ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामध्ये २२.२४ द.ल.घ.मी. पाणी साठविले जाणार असून सिंचन क्षमता २८ हजार ८० हेक्टर आहे. 

आजनसरा बॅरेज प्रकल्प दोन दशकापासून रखडला
हिंगणघाट तालुक्यातील ४० गावे तर चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ८ गावांचे सिंचन यामध्ये समाविष्ट आहे. या प्रकल्पामुळे १ हजार ८१.३८ हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदी-विक्रीचे अधिकार गोठविण्यात आले होते. परंतु प्रकल्पाचे कामच रखडल्याने  शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. आर्थिक अडचणींमुळे उपचाराअभावी काही शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला. अनेकांच्या मुलांच्या शिक्षणासह विवाहाचा प्रश्न गंभीर झाला होता. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून हक्क मिळवून शेतजमिनी कसायला सुुरुवात केली. या वीस वर्षांच्या काळात अनेक मंत्री या प्रकल्पाला भेट देऊन गेलेत. त्यांनी वेळोवेळी हा प्रकल्प तत्काळ पूर्ण केला जाईल, असे आश्वासन दिले, पण आता दोन दशक उलटले तरी कामाला सुरुवात झाली नाही. 

पुलगाव बॅरेज प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

निम्न वर्धा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याकरिता पुलगावजवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याकरिता मे २०१० पासून ९६ कोटी रुपयांच्या पुलगाव बॅरेज प्रकल्पाचे काम सुरू आहे.  या प्रकल्पामुळे नदी काठच्या १३ गावांना लाभ मिळणार असून २३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ऑक्टोंबर २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रतीकात्मक भूमिपूजन झाले होते. परंतु प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात मे २०१० मध्ये होऊन तीन ते चार वर्षांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु शासनाच्या लालफितशाही व संबंधित कंत्राटदार कंपनीला केलेल्या कामाचे देयक न मिळाल्याने काही काळ काम बंद होते. बघता-बघता ९६ कोटींचा हा प्रकल्प तीनशे कोटीच्या पार गेला आहे. या बॅरेजची पाणी साठवण क्षमता १०.८० द.ल.घ.मी. असून उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. आहे. या बॅरेजची लांबी २२५ मीटर असून उंची १४.१७ मीटर तर रुंदी ६.५० मीटर आहे. अतिरिक्त पाणी सोडण्याकरिता  १० बाय ६ फुटाचे पंधरा दरवाजे आहेत. या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून १० टक्के काम प्रगतीपथावर आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पुलगाव शहरासह केंद्रीय दारूगोळा भंडार व परिसरातील पिपरी, पारगोठाण, धनोडी, रोहणा, विरुळ, सोरटा, रसुलाबाद, मार्डा, गुंजखेडा, नाचणगाव, कवठा, मलकापूर आदी गावांची पाणी समस्या कायमची सुटणार आहे. तसेच ३ हजार २३६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

आजनसरा बॅरेज प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी येईल. परिसरातील ९० टक्के शेतकरी कोरडवाहू शेती करतात. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा त्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास परिसरातील शेती सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. 
- प्रशांत संभाजी सुपारे,सोनेगाव (राऊत).
 

आजनसरा बॅरेज प्रकल्प हा मृगजळ ठरला आहे. गेल्या वीस वर्षांपासून प्रकल्प होणार आणि आम्ही बागायतदार होऊ अशी आशा लावून बसलो आहे. अनेक मोठे नेते येतात आणि प्रकल्प होणार म्हणून सांगतात. परंतु अजूनही कामात प्रगती नाही. येथील भूमिपूजनाची शिळाही नदीच्या पुरात वाहून गेली आहे.  प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही नेत्यावर विश्वास बसणार नाही.
- उमेश शंकर कडवडे, आजनसरा.
 

आजनसरा प्रकल्प विदर्भातील महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून पूर्णत्वास गेल्यास हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजनसरा हे श्रीसंत भोजाजी महाराज यांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकल्पामुळे निसर्गावर अवलंबून राहणारे शेतकरी संपन्न होणार आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे.
- विजय कृष्णा परबत, आजनसरा.

आजनसरा बॅरेज प्रकल्पाकरिता पर्यावरण अनुमती आणि वनविभागाची अनुमती मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील वर्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर कार नदी प्रकल्पाच्या कालवा सुधार योजनेची कामे येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. पुढील वर्षी सिंचन क्षेत्रात भरीव वाढ होईल.
- मुकुंद सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग वर्धा.
 

 

Web Title: The Ajansara barrage project has gone from Rs 208 crore to Rs 860 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.