प्रशासनाने कडक निर्बंध वाढविला; फळे-भाजीपाला शेतातच सडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 05:00 AM2021-05-15T05:00:00+5:302021-05-15T05:00:16+5:30

कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व फळे विक्री करण्यास ब्रेक लागला. त्यामुळे बेलोरा (बुजरुक) येथील ११ शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेले २६० टन टरबूज आणि खरबूज खराब झाले. बरीच फळे सडली असून ती शेताच्या बांधावर फेकावी लागली तर काही जनावरांना चारावी लागल्याने तब्बल १६ लाखांचे नुकसान झाले.

The administration increased strict restrictions; Fruits and vegetables rotted in the field | प्रशासनाने कडक निर्बंध वाढविला; फळे-भाजीपाला शेतातच सडला

प्रशासनाने कडक निर्बंध वाढविला; फळे-भाजीपाला शेतातच सडला

Next
ठळक मुद्देबेलोराच्या अकरा शेतकऱ्यांचा टाहो, २६० टन टरबूज-खरबुजाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला पाच दिवस कडक लॉकडाऊन लावला. त्यामध्ये आता पुन्हा पाच दिवसांची मुदतवाढ करण्यात आल्याने सर्व उलाढाल ठप्प झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतमाल उत्पादकांना बसला असून शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला शेताच्या बांधावर किंवा जनावरांना चारण्याची वेळ आली आहे. आधीच खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात तोट्यात गेल्यानंतर आता  उन्हाळी पिकेही लॉकडाऊनमुळे हातची गेली आहेत.
कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व फळे विक्री करण्यास ब्रेक लागला. त्यामुळे बेलोरा (बुजरुक) येथील ११ शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेले २६० टन टरबूज आणि खरबूज खराब झाले. बरीच फळे सडली असून ती शेताच्या बांधावर फेकावी लागली तर काही जनावरांना चारावी लागल्याने तब्बल १६ लाखांचे नुकसान झाले. बेलोरा येथील हुकुम जाणे, उमेश अरुण जाणे, उमेश दयाराम जाणे, वीरेंद्र जाणे, गजानन जाणे, अशोक बोरवार, मनोहर गडलिंग, नकुल जाणे, अजय जाणे, सुरेश जाणे, रमेश जाणे या अकरा शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज या फळांची लागवड केली होती. उन्हाळ्यात या फळांना मोठी मागणी राहत असल्याने शेतकऱ्यांनी चांगलीच मेहनत घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागाही चांगल्या बहरल्यामुळे भरघोस उत्पन्न मिळण्याची आशा पल्लवित झाली होती. मात्र, फळे तोडणीवर आल्यानंतर अचानक प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने आष्टी, आर्वी व कारंजा हे तिन्ही तालुक्यांचे ठिकाण कडकडीत बंद होते. त्यामुळे शेतमाल शेतातच पडून राहिल्याने खराब झाला. शेवटी सर्व शेतकऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी फळे जनावरांना खाऊ घातली. आर्वीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना घरपोच फळे विक्री करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, तोपर्यंत या शेतकऱ्यांच्या हातून चांगली फळे निघून गेली होती. आता सडलेला माल कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

शेतकऱ्यांसाठीचे नियोजनच कोलमडले
जिल्हा प्रशासनासह जिल्हा कृषी अधीक्षक व आत्मा प्रकल्पाच्या संचालकांनी या लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्याकरिता नियोजन करणे अपेक्षित होते; परंतु कोणतेही नियोजन न करता कडक लॉकडाऊन करून त्यात मुदतवाढ केली. बऱ्याच फळ व भाजीपाला उत्पादकांचा शेतमाल खराब झाल्यानंतर घरपोच विक्री करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन काळात सुरुवातीपासून शेतकऱ्यांना विक्री करण्याकरिता पासेस दिल्या असत्या तर ही वेळ आली नसती, असा संताप शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या नियोजनशून्यतेचा शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.

नरसुल्याच्या शेतकऱ्याचेही नुकसान
नरसुला येथील शेतकरी आशिष साठोणे यांनी साडेतीन एकरामध्ये डांगर आणि खरबुजाची लागवड केली. या दोन्ही पिकांच्या लागवडीकरिता एकरी ७० हजार रुपये खर्च आला. यासोबतच या फळांना चांगले रसदार करण्यासाठी शेतकरी परिवाराने मोठे परिश्रम घेतले. फळही चांगले बहरल्याने त्यांनी विकण्याकरिता तोडणी केली. मात्र, अचानक लॉकडाऊन लागल्याने फळे शेतातच पडून आहेत. आता लॉकडाऊन वाढविल्याने सर्व फळे जागेवर खराब झाल्याने आशिष साठोणे यांना आतापर्यंत दीड लाखांचे नुकसान सहन करावे लागले. या फळांच्या विक्रीकरिता प्रशासनाने परवानगी दिली नाही, तर या नुकसानीमध्ये आणखीच भर पडणार असल्याचेही साठोणे यांनी सांगितले.

तोंडले, वांगे पिकले; चवळी जरड झाली
वर्ध्यालगतच्या उमरी (मेघे) येथील वाल्मिक उघडे या शेतकऱ्याने सव्वा एकरामध्ये तोंडले, एक एकरात चवळी आणि अर्ध्या एकरामध्ये वांग्याची लागवड केली. या तिन्ही पिकांच्या विक्रीतून लॉकडाऊनपूर्वी वीस हजार रुपये एका हप्ताचे यायचे. आता पीक चांगले बहरल्याने उत्पादनही चांगले निघत आहे; परंतु बाजारपेठ बंद असल्याने विक्री करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे सध्या वांगे आणि तोंडली झाडालाच पिकली असून चवळी जरड व्हायला लागली आहे. यामुळे दर दिवसाला दहा हजार रुपयांचे नुकसान होत आहे.

 

Web Title: The administration increased strict restrictions; Fruits and vegetables rotted in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.