In 18 hours a new MP will be clear | १८ तासांत नवीन खासदार होणार स्पष्ट
१८ तासांत नवीन खासदार होणार स्पष्ट

ठळक मुद्देलोकसभेची मतमोजणी : १४ टेबलवरून होईल २७ फेऱ्या, पोलिसांचाही राहणार बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील मतदारांनी प्रत्यक्ष मतदानादरम्यान कुठल्या उमेदवाराला बहुमताचा कौल दिला, हे जाणून घेण्यासाठी मतमोजणीची प्रक्रिया येत्या २३ मे रोजी होणार आहे.
गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून एम.आय.डी.सी भागातील एफसीआयच्या गोदाम परिसरात पोस्टल बॅलेटच्या तर ८.३० वाजतापासून ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी होणार आहे. ही मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या १८ तासांत नवीन खासदार कोण यावर शिक्का मोर्तब होणार आहे. इतकेच नव्हे तर ही मतमोजणी प्रक्रिया १४ टेबलवरून २७ फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. मतमोजणीदरम्यान एका फेरीला ४० मिनिटांचा कालावधी लागेल असा अंदाज निवडणूक विभागाला आहे. तर एखादा आक्षेप आल्यास तो दूर करण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया वेळीच पूर्णत्त्वास जाण्यास आक्षेप हे बाधाच ठरणार आहेत.

व्हीव्हीपॅटच्या तपासणीसाठी लागेल २.३० तासांचा कालावधी
वर्धा लोकसभा क्षेत्रातील एकूण ३० भाग्यवान मतदान केंद्राची निवड करून या मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांची चाचपडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी व्हीसीबी कक्षही तयार करण्यात आला आहे. याच कक्षातून ही चाचपडताळी होणार असून त्यासाठी कमीत कमी २.३० तासांचा कालावधी लागणार आहे.

६१.१८ टक्के मतदारांनी बजावला होता मतदानाचा हक्क
वर्धा लोकसभा क्षेत्रात आर्वी, वर्धा, हिंगणघाट, देवळी या वर्धा जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसह अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि मोर्शी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १७ लाख ४१ हजार ९०० या एकूण मतदारांपैकी १० लाख ६५ हजार ७७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची टक्केवारी ६१.१८ इतकी होती. तर याच मतदारांनी कुणाला बहुमताचा कौल दिला हे प्रत्यक्ष मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.

आक्षेप नोंदविणाऱ्यांना द्यावा लागेल लेखी अर्ज
एखाद्याला मतमोजणीदरम्यान आक्षेप नोंदवायचा असल्यास त्याला लेखी स्वरूपात अर्ज सादर करावा लागणार आहे. हा अर्ज केवळ आक्षेप नोंदविणाºयाला निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे. विहित मुदतीत लेखी अर्ज न दिल्यास आक्षेप ग्राह्य धरल्या जाणार नाही, असे सांगण्यात आले.

४५० मनुष्यबळ
मतमोजणी प्रक्रिया पूर्णत्त्वास जाण्यासाठी सुमारे ४५० मनुष्यबळ कार्यरत करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त या परिसरात राहणार आहे.

२८ सीसीटीव्हीची राहणार नजर
संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पारदर्शी व्हावी या हेतूने ही प्रक्रिया आॅन कॅमेरा होणार आहे. इतकेच नव्हे तर तब्बल २८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रियेच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवले जाणार आहे. शिवाय ३० व्हिडीओग्राफरही या परिसरात राहणार आहे. ते प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचे चित्रिकरणा करणार आहेत.

प्रवेशानंतर बाहेर पडणे कठीण
ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्याठिकाणी सर्व सामान्य व्यक्तींना जाता येणार नाही. इतकेच नव्हे तर ज्यांच्याकडे मतमोजणी कक्षापर्यंत जाण्याची पास आहे, अशांनाच मुख्य द्वारातून प्रवेश मिळणार आहे. इतकेच नव्हे तर मतमोजणी कामी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मोबाईलचाही वापर करता येणार नाही. शिवाय एकदा एन्ट्री झालेल्याला मतमोजणी परिसराच्या सुरक्षा घेºयातून बाहेर पडणे कठीणच राहणार आहे.

४०० पोलीस देणार खडा पहारा
सध्या स्टाँग रुम परिसरात एक सीआरपीएफ प्लॅटूनसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन मतमोजणीच्या दिवशी सुमारे ४०० पोलीस अधिकारी व कर्मचारी खडा पहाराच देणार आहेत.

व्हीव्हीपॅट मोजण्याची केंद्राची निवड ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने
यंदाच्या वर्षी व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांचीही मोजणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एका विधानसभा क्षेत्रातील पाच मतदान केंद्राची लकी ड्रॉ पद्धतीने निवड करून वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील एकूण ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांची मोजणी करण्यात येणार आहे. शिवाय विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.

१४ उमेदवारांपैकी एकाचीच लागणार वर्णी
वर्धा लोकसभा क्षेत्रातील एकूण २ हजार २६ मतदान केंद्रावरून १७ लाख ४१ हजार ९०० मतदारांपैकी १० लाख ६५ हजार ७७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. वर्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसच्या अ‍ॅड. चारूलता टोकस, भाजपचे रामदास तडस, बसपाचे शैलेश अग्रवाल यांच्यासह एकूण १४ उमेदवार आहेत. असे असले तरी मतमोजणीनंतर बहुमताच्या कौलावर एकाच उमेदवारांची वर्णी लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निघणार भाग्यवान मतदान केंद्राचे नाव
ईव्हीएम मतमोजणीनंतर वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रातील एकूण ३० भाग्यवान मतदान केंद्राची लकी ड्रॉ पद्धतीने निवड करून त्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांची चाचपडताळणी करण्यात येणार आहे. उल्लेखनिय म्हणजे या सोडतीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या हस्ते भाग्यवान मतदान केंद्रांच्या नावांची चिठ्ठी पारदर्शी पद्धतीने काढण्यात येणार आहे.

एक फेरी होईपर्यंत दुसऱ्या फेरीच्या पेट्या नाही
मतमोजणी दरम्यान एक फेरी सुरू असताना दुसऱ्या फेरीसाठीच्या ईव्हीएम बाहेर आणल्या जाणार नाही.
त्यामुळे मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना पहिली फेरी पूर्ण होईस्तोवर दुसऱ्या फेरीच्या मशीनांसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शिवाय फेरी संपल्यावर कुणाला किती मत मिळाली याची माहिती सांगितली जाणार आहे.


Web Title: In 18 hours a new MP will be clear
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.