नऊ महिन्यांत ३२२ अपघातांत १५६ जणांचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 04:13 PM2021-10-17T16:13:30+5:302021-10-17T17:47:46+5:30

खोदलेला रस्ता, अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, एकेरी वाहतूक यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. या रस्त्यावर अनेकांचा बळी गेला आहे. अनेक रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झालेली दिसून येते.

156 killed in 322 accidents in nine months | नऊ महिन्यांत ३२२ अपघातांत १५६ जणांचा बळी!

नऊ महिन्यांत ३२२ अपघातांत १५६ जणांचा बळी!

Next
ठळक मुद्देअपघातांचे प्रमाण चिंताजनक : महामार्गावर सर्वाधिक अपघात

वर्धा : जिल्ह्यातील राज्य महामार्गांसह अन्य मार्ग सध्या साक्षात यमदूत वाटू लागल्याने या खडतर मार्गाने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न वाहनधारक व प्रवाशांना पडला आहे.

खड्डेमय रस्त्यांनी मरणच स्वस्त करून टाकले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या काळात तब्बल ३३२ अपघातांच्या घटना घडल्या. त्यामध्ये १५६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. १४१ जणांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा आधारच उद्ध्वस्त झाला आहे. यातील काही जण कुबड्यांच्या सहाऱ्यावर जीवन जगत आहेत तर काही जण कायमचे अंथरुणावर खिळून पडले आहेत.

महामार्गासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच वाहनांची गती आवाक्याबाहेर जात असल्याने प्रवास करणेदेखील जिकिरीचे झाले आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडून लोक दगावत आहेत. खोदलेला रस्ता, अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, एकेरी वाहतूक यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. या  रस्त्यावर अनेकांचा बळी गेला आहे. अनेक रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झालेली दिसून येते.

जानेवारी ते सप्टेंबर २०२१ या नऊ महिन्यांत जिल्ह्यात ३२२ अपघातांच्या घटनांची नोंद झाली आहे. त्यापैकी १४१ अपघात एवढे भीषण होते की त्यामध्ये १५६ जणांना प्राणास मुकावे लागले. त्यामुळे महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे. कुणाला हात तर कुणाला पाय गमवावा लागला आहे. काहींचा तर कमरेखालील भागच निकामी झाला. एकंदरीत घरच्या कर्त्या असलेल्या व्यक्तींना अपंगत्व आल्याने त्यांच्या कुटुंबीयांची वाताहत सुरू आहे. वाढत्या अपघातांच्या घटना पाहता लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

खराब रस्ते ठरलेत साक्षात यमदूत

जिल्ह्यात विविध गावांत रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे खराब रस्त्यांनी अनेकांचे जीव घेतले असून हे रस्ते साक्षात यमदूत ठरले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर ४७, राज्य महामार्गावर ५८, शहरी भागातील रस्त्यांवर ३२ तर गावखेड्यातील रस्त्यांवर १९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एकूण अपघात ३२२

एकूण मृत्यू १५६

गंभीर जखमी १४१

पुरुष मृत्यू १४५

महिला मृत्यू ११

मार्ग     -        मृत्यू

नॅशनल हायवे - ४७

राज्य महामार्ग - ५८

शहरी रस्ते  -     ३२

गाव रस्ते       -  १९

Web Title: 156 killed in 322 accidents in nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.