Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:23 IST2025-12-02T12:21:18+5:302025-12-02T12:23:13+5:30
Uttar Pradesh Bus Fire: उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे मंगळवारी पहाटे भीषण अपघात घडला.

Representative Image
उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे मंगळवारी पहाटे भीषण अपघात घडला. कोतवाली देहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलवारिया बायपासजवळ बसने ट्रकला जोरदार धडक दिल्यानंतर पेट घेतला. या दुर्दैवी अपघातात तीन जणांना मृत्यू झाला आहे. तर, २३ जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना बहराइच मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनौलीहून दिल्लीला जाणारी बस पहाटे २:१५ वाजता फुलवारिया चौकात एका ट्रकला धडकली. या धडकेनंतर बसने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले. अनेक प्रवाशांनी काचा फोडल्या आणि बसमधून बाहेर पडले आणि इतरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, तोपर्यंत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, बसखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
या घटनेत एकूण २३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर बहराइच येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. गंभीर भाजल्यामुळे मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींपैकी बहुतेक लोक नेपाळचे आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.