Violence of voting conflicts; Crime against 10 people in Osmanabad | मतदानाच्या गोपनीयतेचा भंग;उस्मानाबादेत १० जणांवर गुन्हे
मतदानाच्या गोपनीयतेचा भंग;उस्मानाबादेत १० जणांवर गुन्हे

उस्मानाबाद : मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केल्याने उस्मानाबाद व मुरुम येथे तब्बल १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ त्यांच्यावर मतदान केंद्रात मोबाईल नेल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे़

उस्मानाबाद जिल्ह्यात आपण केलेले मतदान सोशल मिडीयात जाहीर करण्याची जणू स्पर्धाच लागली होती़ पहिले प्रकरण प्रवीण वीर पाटील याचे उघडकीस आले़ त्याने मतदान करतानाचा व्हीडिओच फेसबुकवर लाईव्ह केला होता़ यानंतर निवडणूक प्रक्रियेतील अधिका-यांनी पावले उचलत कारवाईला सुरुवात केली

दरम्यान, प्रवीण याच्या लक्षात ही चूक आल्यानंतर त्याने तातडीने हा व्हीडिओ फेसबुकवरुन हटवला़ मात्र, तोपर्यंत प्रशासनाकडून शहर ठाण्यात तक्रार देण्यात आली होती़ प्रवीणसोबतच उस्मानाबाद शहरातीलच ओंकार राजेश भुसारे, महेश मगर, सागर बागल, रोहित चव्हाण, प्रमोद जाधव, इरशाद काझी व एका मोबाईल नंबरवरुन व्हॉट्सअपवर मतदान प्रक्रियेचा भंग करणा-या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांच्या निर्देशानुसार व्हीजीलन्स पथक प्रमुख सुनिल बडूरकर यांनी तक्रार दिली आहे़.

उपरोक्त व्यक्तींनी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास प्रतिबंधअसतानाही तो नेऊन मतदान करीत असतानाची छायाचित्रे, व्हीडिओ सोशल मिडीयात प्रसारित केली़  यामुळे मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग झाले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे़ यानुसार भादंविचे कलम १८८ व लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५८ व १९८८ च्या कलम १२८ नुसार शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, उमरगा तालुक्यातील महालिंगरायवाडी येथील प्रशांत लक्ष्मण पोचापुरे याच्याविरुद्धही मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी सहा़निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्या निर्देशानुसार मुरुम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़


Web Title: Violence of voting conflicts; Crime against 10 people in Osmanabad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.