‘सोना और पैसा निकालो, नही तो मार देंगे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:22 AM2021-06-22T04:22:36+5:302021-06-22T04:22:36+5:30

कळंब : ‘सोना और पैसा निकालो, नही तो मार देंगे’, असे धमकावत, साडीने हातपाय बांधून एका वृद्ध दांपत्याच्या घरातील ...

‘Take out gold and money, or you will be killed’ | ‘सोना और पैसा निकालो, नही तो मार देंगे’

‘सोना और पैसा निकालो, नही तो मार देंगे’

googlenewsNext

कळंब : ‘सोना और पैसा निकालो, नही तो मार देंगे’, असे धमकावत, साडीने हातपाय बांधून एका वृद्ध दांपत्याच्या घरातील २ लाख ६६ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना तालुक्यातील हावरगाव येथे घडली. विशेष म्हणजे प्रमुख जिल्हा मार्गावरील बंगल्यात ही घटना घडली.

हावरगाव येथील देवीदास लिंबाजी अंकुशे हे ८२ वर्षीय सेवानिवृत्त ग्रामसेवक कळंब इटकूर रस्त्यावरील आपल्या हावरगाव येथील शेतामध्ये बांधलेल्या बंगल्यात वास्तव्य करतात. त्यांचा मुलगा मधुसूदन देवीदास अंकुशे हे नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. वर्दळीच्या प्रमुख जिल्हा मार्गावर असलेल्या या बंगल्यात सध्या सेवानिवृत्त ग्रामसेवक देवीदास अंकुशे हे आपल्या पत्नी विमलबाई यांच्यासमवेत राहतात. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे हे वृद्ध दांपत्य बंगल्यात झोपले असताना रात्री साडेबारा वाजता दरवाजाचा मोठा आवाज झाला. यामुळे देवीदास अंकुशे यांना जाग आली. याच क्षणात कडी, कोयंडा तुटल्याचे व आतमध्ये चार व्यक्ती घुसल्याचे दिसून आले.

यावेळी या चौघांपैकी एकाने देवीदास अंकुशे यांना पकडून ठेवले व ‘सोना और पैसा निकाल, नही तो मार देंगे’ असे धमकावले. यावेळी घाबरलेल्या अंकुशे यांनी लाकडी कपाट उघडत हँडबॅगमधील २२ हजारांची रोकड त्यांच्या हवाली केली. यानंतर दुसऱ्या खोलीतील अंकुशे यांच्या ७० वर्षीय पत्नी विमलबाई यांना जिवे मारण्याची धमकी देत गादीखालील कपाटाची चावी घेऊन कपाटातील सोन्याच्या पाटल्या, गंठण, झुंबर, अंगठी, चांदीचे काही ऐवज व काही रोकड चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात देवीदास लिंबाजी अंकुशे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंसं कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि अतुल पाटील करत आहेत.

चौकट...

श्वान पथक दाखल : एकास अटक

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. चोरी झालेल्या घरापासून काही अंतरावर त्याने माग काढल्याचे समजते. यानुसार एका तीस वर्षीय व्यक्तीस अटक करण्यात आली असून, त्यास सोमवारी कळंब न्यायलयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वृद्ध दांपत्याचे साडीने पाय बांधले

हावरगाव येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक देविदास अंकुशे व पत्नी विमलबाई या वृद्ध दांपत्याच्या घरात दरोडा टाकून पोबारा करताना आरोपींनी दांपत्याचे साडीने पाय बांधून टाकले होते. यानंतर अंकुशे यांनी शेजारील पुतण्या शिवाजी अंकुशे यांना उद्देशून जोराने आवाज दिला. यानंतर दीडच्या सुमारास त्यांची सुटका झाली.

गुन्ह्यांची मालिका थांबेना...

सव्वा कोटीचा गांजा, अडत वॉचमनचा मर्डर, बनावट ई पासचे रॅकेट, भररस्त्यावरील अडत व वाटसरूला लुटण्याचा प्रकार असे काही गंभीर गुन्हे मागच्या महिनाभरात कळंबमध्ये समोर आले होते. यातच आता नांदेड येथे कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांना हावरगाव येथील वृध्द मातापित्यांना लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.

Web Title: ‘Take out gold and money, or you will be killed’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.