सोयाबीनचा दर पाच हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:35 AM2021-09-25T04:35:56+5:302021-09-25T04:35:56+5:30

कळंब : इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न देणारे पीक ठरल्याने अलीकडे सोयाबीनचा पेरा वेगाने वाढलेल्या कळंब तालुक्यातील शेतकरी, दरात ...

Soybean price at five thousand | सोयाबीनचा दर पाच हजारावर

सोयाबीनचा दर पाच हजारावर

googlenewsNext

कळंब : इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न देणारे पीक ठरल्याने अलीकडे सोयाबीनचा पेरा वेगाने वाढलेल्या कळंब तालुक्यातील शेतकरी, दरात झालेल्या कमालीच्या घसरणीमुळे मात्र हवालदिल बनला आहे. अवघ्या दहा दिवसात दहा हजारावरून दराची पाच हजारावर घसरण झाली आहे.

कळंब तालुक्यात मागच्या दशकभरात पीक पद्धतीत अमूलाग्र बदल घडून आले आहेत. तूर, उडीद, मूग व कापूस या पिकांचा वरचष्मा मोडीत काढत एकूण पेरा झालेल्या क्षेत्रापैकी ऐंशी टक्के क्षेत्रावर एकट्या सोयाबीनचा बोलबाला निर्माण झाला आहे. इतर पिकांच्या तुलनेत कमी कालावधीत अधिक उत्पन्न देत असल्याने या पिकाच्या क्षेत्रातही वाढ नोंदली जात होती. यंदाही गतवर्षीच्या तुलनेत पाच हजार हेक्टरने वाढ होत तालुक्यातील सोयाबीनचे क्षेत्र साठ हजार हेक्टर झाले. पेरणी केल्यानंतर पहिला महिना पाऊसपाण्याच्या संदर्भात सुलभ गेला असला तरी, पुढे तब्बल २५ दिवस पावसाने ओढ दिल्याने हा खंड एकरी उत्पादनाला मारक ठरला होता.

उत्पादनात घट दृष्टिपथात दिसत असली तरी, बाजारात दरवृद्धीमुळे सोयाबीनचा ‘रूबाब’ होता. यामुळे उतार घटला तरी, दसहजारी ठरलेल्या सोयाबीनमुळे मालामाल होऊ असा शेतकऱ्यांचा आशावाद होता. परंतु, मागच्या दहा दिवसात हा दर पाच हजारावर आल्याने शेतकऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. आजच्या घडीला वाढलेला उत्पादन खर्च, काढणी व मळणीचा वाढता हिशेब गृहीत धरता, हा हंगाम मोठे आर्थिक नुकसान करणारा ठरत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

सोयाबीनचे दर...

महिना आवक (क्विंटल) दर (प्रतिक्विंटल )

जानेवारी २०२० ११९४७ ३९५०

जून २०२० ६१७२ ३८००

ऑक्टोबर २०२० ४७२०६ ३८००

जानेवारी २०२१ १०७१० ४३५०

जून २०२१ ११४१ ७३१०

सप्टेंबर २०२१ १३३७ ८०५०

सोयाबीनचा पेरा...

साल हेक्टर

२०१८ ५२०००

२०१९ ६३०००

२०२० ६५०००

२०२१ ६००००

प्रतिक्रिया...

यंदा मोठ्या संकटाने थोडेबहुत पीक हाती आले आहे. यास फडात उभे असताना आठ-नऊ हजाराचा दर होता. आता काढणी करावयाची आहे, तर दर अर्ध्यावर आला आहे. आजच्या भावात याचे विसेक हजारही येणार नाहीत. हा मोठा फटका आहे.

- बब्रुवान गोरे, शेतकरी, मस्सा (खं)

सध्या सोयाबीन पाच हजाराच्या आसपास आहे. यास काढावयास साडेचार हजार रुपये लागत आहेत. मळणीही महागली आहे. दर वाढला म्हणून मजूर जादा पैसै घेत आहेत. असे असताना सोयाबीन तर बेभाव विकले जात आहे. प्रत्येक शेतकरी यात खपला जात आहे. यामुळे भाववाढ झाली पाहिजे.

- राजाभाऊ गंभिरे, ईटकूर

बाजारभावाची चढ-उतार सामान्य व्यापाऱ्यांच्या आकलनाबाहेरची आहे. भाव का कोसळत आहेत, हे आम्हाला समजत नाही. आता पाहा, लातूर मिलच्या सकाळ अन् दुपारच्या भावात सहाशेची घट झाली आहे. काही तासाला असे घडत असेल, तर दूरचे काय सांगावे?

- लक्ष्मण कोल्हे, व्यापारी, कळंब

Web Title: Soybean price at five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.