बंधाऱ्यांची होणार एकाच वेळी दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:22 AM2021-06-22T04:22:34+5:302021-06-22T04:22:34+5:30

उस्मानाबाद : मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वीच्या काही वर्षांपूर्वीचा अभ्यास केला ...

Simultaneous repair of dams | बंधाऱ्यांची होणार एकाच वेळी दुरुस्ती

बंधाऱ्यांची होणार एकाच वेळी दुरुस्ती

googlenewsNext

उस्मानाबाद : मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वीच्या काही वर्षांपूर्वीचा अभ्यास केला असता दरवर्षी शंभर-दीडशे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. जिल्ह्यातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम एकाच वेळी (वन स्ट्रोक) हाती घेण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीकडून जास्तीत जास्त देण्यात येईलच, त्याशिवाय राज्य सरकारकडूनही निधी उपलब्ध करून हे काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सोमवारी येथे केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर होते. यावेळी जि. प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, आ. विक्रम काळे, आ. ज्ञानराज चौगुले, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत दे. कुंटला, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम श्री. कुंटला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल सगर, आदी उपस्थित होते.

मराठवाड्यातील दुर्लक्षित अशा जिल्ह्यात अतिशय देखणी इमारत उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाच्या इमारतींच्या वैभवात भर घालणारी ही इमारत आहे. तेव्हा जिल्ह्याच्या विकासाचे काम येथून व्हावे. या इमारतीची स्वच्छता आणि देखभाल राखली जावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना प्राथमिक तत्त्वावर तीन ठिकाणी अर्ध स्वयंचलित यांत्रिकी गेट बसविण्यास मान्यता दिली आहे. सध्याच्या प्राप्त निधीतून ६७ कोल्हापुरी बंधारे आणि १०९ लघू पाटबंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या काळात या कामांना गती देता आली नाही. परंतु, जिल्ह्यातील पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जुन्या सर्व बंधाऱ्यांची एकाच वेळी जिल्हा नियोजनमधून आणि राज्य सरकारकडून निधी मिळवून दुुरुस्ती करण्यात येईल. या कामासाठी शंभर ते १२५ कोटी रुपयांची गरज आहे. एवढा निधी प्राप्त केला जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रारंभी नियोजन भवन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ दीपप्रज्वलन करून आणि कोनशीलेचे अनावरण करून पालकमंत्री गडाख यांनी या इमारतीचे उद्घाटन केले. त्यानंतर फिरून संबंध इमारतीची पाहणीही केली.

९९ टक्के निधी खर्च

जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आत्मा आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ करिता २६० कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी २५९ कोटी ४० लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला. या खर्चाची टक्केवारी ९९.४६ इतकी आहे. गेल्या वर्षी तालुकानिहाय समप्रमाणात कामांचे वाटप करण्यास प्राधान्य देण्यात आले, तर नगरपालिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले, असे गडाख यावेळी म्हणाले.

यांचा झाला सत्कार

यावेळी इमारतीचे ठेकेदार लोकमंगल कन्स्ट्रक्शन कंपनी, सोलापूर, वास्तुविशारद, विद्युत विषयक काम केलेल्या सुवर्ण इंटरप्रायजेस, आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुलकर्णी आणि सगर यांचाही सत्कार पालकमंत्र्यांनी केला. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने काढलेल्या खरीप हंगामातील पिकांमध्ये सर्वाधिक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या लागवड पद्धतीवरील पुस्तकाचे प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Simultaneous repair of dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.